विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 21:51 IST2025-06-20T21:48:52+5:302025-06-20T21:51:24+5:30

- संचेती चाैकात हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी; वरुण राजाच्या हजेरीसह भक्तीरसात पुणेकर चिंब

Ashadhi Wari 2025 Vitthal Tal Vitthal Dindi. Vitthal is pronounced with the mouth. Gyanoba-Tukoba's festival in Pune, which was held at Muthatiri. | विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा

पुणे : टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानाेबा-तुकाराम’चा जयघाेष करत लाखाे वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी साेहळा शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी संचेती चाैकात पाेहाेचला. यावेळी पालखी साेहळ्यावर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबराेबर वरुण राजानेही हजेरी लावत पुण्यात दाेन्ही पालख्यांचे स्वागत केले. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघाेषाने संपुर्ण परिसर दुमदुमला.

लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेला लाखाे वारकऱ्यांचा मेळा पुण्यात येताच पुणेकर भक्तिरसात चिंब झाले. त्यातच हलक्या सरी देखील बरसल्या. दरम्यान, जागाे-जागाे ध्वनिक्षेपकावरून अभंगा कानी पडत हाेते. एक-एक करून दिंडीचे शहरात आगमन झाले. संत तुकाेबांचा नगारखाना आणि पाठाेपाठ मानाचा अश्व चाैकात दाखल झाला आणि भाविकांनी एकच गर्दी केली. त्या पाठाेपाठ सायंकाळी ५.१८ वाजता तुकाेबांचा रथ दाखल झाला. चाैकातून थाेडे पुढे येताच धारकरी साेहळ्यात आले आणि भिडे गुरुजी पालखी रथात बसले. पाेलिसांनी माेठ्या बंदाेबस्तात साेहळ्याला मार्ग करून दिला.

त्यानंतर तब्बल २ तास १० मिनिटांनी म्हणजेच ७.२८ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी साेहळा संचेती चाैकात दाखल झाला. दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. रात्री उशिरा संत तुकाेबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली.

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥

विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥

संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले आणि पुणेकरांना संत तुकाराम महाराजांच्या वरील अभंगाचा प्रत्यय आला. पालखी साेहळा पुण्यात येणार म्हणून पुणेकरांनी आधीच जय्यत तयारी केली हाेती. वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजाराे हात सरसावले. जाे-ताे त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार माउली आणि तुकाेबांच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी आतुर झाला हाेता. राज्य सरकार, महापालिका प्रशासन, पाेलिस यंत्रणा, आराेग्य विभाग यासह विविध सेवाभावी संस्था-संघटनांनी देखील पुढाकार घेतला. संतांच्याच भाषेत सांगायचे तर ‘साधु-संत येती घरा, ताेची दिवाळी दसरा’ अशी पुणेकरांची भावना हाेती.

काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥ या भावनेने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. लहानांपासून थाेरापर्यंत सर्वच नामघाेषात तल्लीन झाले. दर्शन हाेताच भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत हाेता. ‘आनंदाचे डाेही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदसे’ ही भावना वारकऱ्यांची आणि पुणेकरांची झाली हाेती. पुढील दाेन दिवस संतांचा सहवास लाभणार आणि त्यांची सेवा करायला मिळणार याबद्दल पुणेकर समाधान व्यक्त करीत आहेत.
 

पालकांच्या स्वागताला वरुण राजाचीही हजेरी :

'ज्ञानोबा - तुकाराम'चा जयघोष करत पालखी सोहळा पुण्यात दाखल होताच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच वरुण राजांनीही हजेरी लावत पालकांचे स्वागत केले. रिमझिम पावसातही दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.

Web Title: Ashadhi Wari 2025 Vitthal Tal Vitthal Dindi. Vitthal is pronounced with the mouth. Gyanoba-Tukoba's festival in Pune, which was held at Muthatiri.