Asha Bhosle Passed Away: आशाताईंचा एका दिवसात १०-१० गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्याचा उत्साह थक्क करणारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 15:52 IST2026-04-13T15:51:59+5:302026-04-13T15:52:44+5:30
Asha Bhosle Passed Away जगातील इतर गायकांच्या एकूण हिट गाण्यांच्या तुलनेत एकट्या आशाताईंच्या सुपरहिट गाण्यांची संख्या मोठी

Asha Bhosle Passed Away: आशाताईंचा एका दिवसात १०-१० गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्याचा उत्साह थक्क करणारा
पुणे : आशाताई आणि मंगेशकर घराण्याचे भारतीय संगीतातील योगदान शब्दातीत आहे. १९९२ पासून त्यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव हे केवळ सांगीतिक नसून, ते कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रतीक आहेत. भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा-मोहरा बदलण्यात आशाताई आणि लतादीदी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या आगमनापूर्वीची गायकी आणि त्यानंतर त्यांनी आणलेली शैली यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यांनी गायकीला आधुनिक आणि चिरतरुण परिमाण दिले. एका दिवसात १०-१० गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्याचा त्यांचा उत्साह थक्क करणारा हाेता. जगातील इतर गायकांच्या एकूण हिट गाण्यांच्या तुलनेत एकट्या आशाताईंच्या सुपरहिट गाण्यांची संख्या मोठी आहे.
आजही लहान मुलांच्या अंताक्षरीपासून ते मोठ्यांच्या मैफलींपर्यंत आशाताईंचीच गाणी राज्य करतात. एवढ्या मोठ्या पदावर असूनही आशाताईंचे पाय जमिनीवर हाेते. त्यांच्यात एक ‘आपलेपण’ हाेते. त्या केवळ गायिका म्हणून वावरल्या नाहीत, तर वाद्यवृंदातील प्रत्येक सदस्याशी त्यांचे वैयक्तिक नाते होते. कलाकारांच्या कौटुंबिक अडचणी, मुलांचे शिक्षण किंवा घरगुती गोष्टींची त्यांना पूर्ण जाणीव असायची.
स्वतः एका शिखरावर असतानाही त्यांनी माझ्या पत्नीला ‘घर कसं सांभाळायचं किंवा ऑफिसमध्ये कसं बोलायचं,’ याचा सल्ला दिला हाेता. त्यांनी कायमच छोट्या कलाकारांना सन्मानाची वागणूक दिली आणि त्यांच्या आयुष्यातील घडामोडींची प्रेमाने विचारपूस केली. थक्क करणारी स्मरणशक्ती आणि ऊर्जा आशाताईंची स्मरणशक्ती हा एक आश्चर्याचा विषय आहे. अनेक जुन्या चित्रपटातील गाणी, जी कदाचित आपण विसरलो असू, ती त्यांना तोंडपाठ हाेती.
पाचगणीच्या बंगल्यावरील भेटी असोत किंवा अलीकडची सहा महिन्यांपूर्वीची भेट, त्यांचा कामाप्रति असलेला उत्साह आणि संगीतावरील निष्ठा थक्क करणारी हाेती. मंगेशकर घराण्याने गेल्या ७०-८० वर्षांपासून भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवले आहे. आशाताई केवळ त्यांच्या आवाजामुळे ‘स्टार’ नाहीत, तर त्या त्यांच्यातील संवेदनशील ‘माणूस’पणामुळे अधिक महान ठरतात. त्या गायिका म्हणून जितक्या थोर आहेत, त्यापेक्षाही कित्येक पटीने त्या माणूस म्हणून श्रेष्ठ आहेत.
- मिलिंद दाते, बासरी वादक