येरवडा जेलातून जामीन मिळताच गल्लीत हवा; त्याच गल्लीत गुंडांची पोलिसांकडून वरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:35 IST2025-01-10T15:34:48+5:302025-01-10T15:35:51+5:30
या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत तक्रारही केली, परंतु पोलिसांनी कारवाई केलीच नाही

येरवडा जेलातून जामीन मिळताच गल्लीत हवा; त्याच गल्लीत गुंडांची पोलिसांकडून वरात
- किरण शिंदे
पुणे - येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणी प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे टोळीवर मोक्काची कारवाई केली होती. गुड्या कसबे मंगळवारी (दि. ७) सायंकाळी येरवडा कारागृहातून बाहेर आला. तो बाहेर येताच त्याने व त्याच्या समर्थकांनी काढलेली रॅली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र त्याच्या समर्थनार्थ काढण्यात आली. रात्रीच्या वेळी या टोळक्याने संपूर्ण परिसरात दहशत माजवली होती. नागरिकांना धमकावले होते. या झालेल्या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत तक्रारही केली, परंतु पोलिसांनी कारवाई केलीच नाही असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे.
मात्र दोन दिवसानंतर भाईच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. पेपरात, टीव्ही चॅनेलमध्ये बातम्या आल्या. आणि त्यानंतर पोलीसही जागे झाले. रॅलीत सहभागी झालेल्या भाईच्या पंटरची शोधाशोध सुरु झाली. पोलीस आपल्याला शोधतायत म्हटल्यावर भाई अंडरग्राउंड झाला. पंटरची ही पळापळ झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि भाईच्या रॅलीत सहभागी झालेल्या नऊ जणांना ताब्यात घेतलं. अजूनही काहींचा शोध पोलीस घेतायत. गुड्ड्या भाई मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याच्याही शोधात आहेतच. मात्र जे हाती लागलेत त्यांची पोलिसांनी चांगलीच वरात काढली. ज्या परिसरात हे पंटर भाईच्या रॅलीत सहभागी झाले होते, ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती. त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची वरात काढली.
प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील आणि तुषार पेठे यांच्यासह ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई लहू गडमवाड यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
समर्थनार्थ काढलेली रॅली उलटली
चार वर्षापूर्वी तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गुंड गजा मारणे याच्या रॅलीनंतर शहरातील गुन्हेगारी ढवळून निघाली होती. त्यानंतरच शहरात टोळ्यांवर मोक्काचे सत्र सुरू झाले होते. त्यानंतर सुमारे २४० टोळ्यांवर मागील चार वर्षांत मोक्का अंतर्गत कारवाई झाली. त्यापैकी एका मोक्काच्या कारवाईत कारागृहात असलेला प्रफुल्ल कसबे जामिनावर सुटला. मात्र त्याच्या समर्थनार्थ काढलेली रॅली ही त्याच्यावर उलटली आहे. पोलिसांनी याप्रकरणात त्याला करण्याची तजवीज देखील ठेवली आहे.