एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा
By किरण शिंदे | Updated: May 27, 2025 15:39 IST2025-05-27T15:37:59+5:302025-05-27T15:39:45+5:30
वैष्णवीच्या आत्महत्येमुळे केवळ एका कुटुंबियाने नाही तर संपूर्ण समाजानेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे

एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा
पुणे: वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या लग्नासाठी झालेला कोट्यवधी रुपयांच्या खर्च मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. वैष्णवीच्या आत्महत्येमुळे केवळ एका कुटुंबियाने नाही तर संपूर्ण समाजानेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात लग्नासाठी झालेल्या अवाजवी खर्चाकडे बोट दाखवले जात आहे. आणि संपूर्ण प्रकाराला ‘हुंड्याचा नवा चेहरा’ मानले जात आहे.
वैष्णवीच्या लग्नासाठी हगवणे कुटुंबीयांनी कस्पटे कुटुंबीयांवर ज्या अटी लादल्या, त्या धक्कादायक आहेत. तिच्या वडिलांना तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यासाठी भाग पाडल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश रक्कम ही बडेजाव दाखवण्यासाठी खर्च झाली.
वैष्णवीच्या लग्नात नेमका किती खर्च झाला त्याचे तपशील खालील प्रमाणे..
- आलिशान रिसॉर्ट भाड्याने: लग्नासाठी दहा लाख रुपयांचे भाडे असलेले रिसॉर्ट घेतले गेले.
- स्टेज डेकोरेशन: सजावटीसाठी एकट्या स्टेजवर २२ लाख रुपये खर्च झाले.
- जेवणावळीचा खर्च: पाच हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले. प्रत्येकी जेवणाचा खर्च १,००० रुपये धरून एकूण ५० लाख रुपये केवळ जेवणावर खर्च झाले.
- सत्कार-स्वागत आणि कपडे: पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या कपड्यांसाठी वेगळा मोठा खर्च झाला.
- इव्हेंट मॅनेजमेंट खर्च: संपूर्ण लग्नाचे कंत्राट खासगी इव्हेंट कंपनीला देण्यात आले आणि त्यासाठी लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांकडून घेतले गेले.
- हुंडा म्हणून: हगवणे कुटुंबीयांनी ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर गाडी घेतली.
- एकूण मिळून एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी किमान दीड कोटी रुपये खर्च झाला.
दरम्यान, समाजात नवविवाहित मुलींच्या वडिलांवर अशा प्रकारचा खर्च करण्याचा दबाव निर्माण होऊ लागला आहे. 'हुंडा बंदी' असतानाही अशा अप्रत्यक्ष पद्धतीने हुंडा घेण्याची प्रथा वाढीस लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी तर लग्न सोहळ्यात होणाऱ्या अवास्तव खर्चाला थेट हुंड्याचे रूप मानत कठोर कारवाईची मागणी केली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उभे केले असून, ‘लग्न म्हणजे केवळ सामाजिक विधी आहे की दिखाव्याची स्पर्धा?’ असा सवाल उपस्थित होत आहे."