Pune: सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी; हडपसर परिसरातील खळबळजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:23 IST2025-02-17T16:20:09+5:302025-02-17T16:23:39+5:30
मांजरांच्या ओरडण्याच्या आवाजाने त्रस्त रहिवाशांनी केली तक्रार, ४८ तासात मांजरी सदनिकेतून हटविण्याची महापालिकेची नोटीस

Pune: सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी; हडपसर परिसरातील खळबळजनक प्रकार
हडपसर : हडपसर येथील मार्वल बॉन्टिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत नवव्या मजल्यावर साडेतीन बीएचके सदनिकेत मागील पाच ते सहा वर्षांपासून तीनशेपेक्षा जास्त मांजरी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. महापालिका आणि पोलिस बंदोबस्तात सदनिकेची पाहणी करण्यात आली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी पाळल्याने सोसायटीच्या आवारात दुर्गंधी होत असून, मांजरांच्या ओरडण्याच्या आवाजाने रहिवासी त्रस्त झाले होते. अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर अखेर ही कारवाई करण्यात आली. महापालिकेने ४८ तासांच्या आत मांजरी सदनिकेतून हटविण्याची नोटीस सदनिकाधारकांना दिली आहे.
हडपसर येथील मार्वल बॉन्टिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत नवव्या मजल्यावर साडेतीन बीएचके सदनिकेत मागील पाच ते सहा वर्षांपासून मांजरी पाळल्या जात असल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. या मांजरीची विष्ठा ''ड्रेनेज लाइन'' मध्ये टाकली जात असे आणि कामगार ती घाण सोसायटीबाहेर घेऊन जात असे. यामुळे सोसायटीत मोठी दुर्गंधी पसरली आहे. या मांजरी पाळण्यासाठी सुमारे १० ते १४ कामगार नेमले होते. लिफ्टमधून विष्ठा नेताना स्थानिक रहिवाशांना त्रास होत होता.
सोसायटीतील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पुणे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी सारिका फुंदे यांनी गुरुवारी संबंधित सदनिकेच्या बाहेर उभे राहून दार उघडण्याची विनंती केली. मात्र, सदनिकाधारकाने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक तास दार उघडले नाही. अखेर, पोलिसांच्या मदतीने दार उघडले. त्या वेळी सदनिकेच्या हॉल आणि बेडरूममध्ये सुमारे ३०० हून अधिक मांजरी असल्याचे आढळले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी असल्याने दार उघडताच उम्र वास आला. या मांजरी सदनिकेतून बाहेर काढून त्यांचे पुढील ४८ तासांत दुसरीकडे स्थलांतर करण्याची नोटीस सदनिकाधारक रिंकू भारद्वाज आणि बहीण रितू भारद्वाज यांना महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.