पुणे जिल्ह्यात तब्बल १७३ घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 01:17 PM2023-10-29T13:17:15+5:302023-10-29T13:17:28+5:30

चौकशीत आरोपींनी संगनमताने पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्यातील विविध भागात घरफोडी केल्याचे कबूल केले

As many as 173 burglary gangs jailed in Pune district 1 crore seized | पुणे जिल्ह्यात तब्बल १७३ घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यात तब्बल १७३ घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : शहरातील विविध भागात दिवसा रेकी करायची आणि रात्री घरफोडी करायची असे गुन्हे करणाऱ्या टोळीला पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीकडून सव्वाकिलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, तीन पिस्तुले, १४ जिवंत काडतुसे आणि चोरीची वाहने असा १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील १७३ गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (२३, रा. मांजरी), बच्चनसिंग जोगींदरसिंग भोंड (२५, वैदवाडी), रामजितसिंग रणजिंतसिंग टाक, कणवरसिंग काळुसिंग टाक, सोन्याचे व्यापारी संतोष शिवाजी पारगे (४५,रा. हडपसर), गोपीनाथ जालिंदर बोराडे (२९), रोहितसिंग सुरेंद्रसिंग जुनी (२२), आरती मंगलसिंग टाक (३२) आणि कविता मन्नुसिंग टाक (३०) यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हडपसर भागातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी हे फुरसुंगी गावातील झाडींमध्ये लपल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून दुधानी, भोंड यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता आरोपींकडून तीन पिस्तुले, १४ जिवंत काडतुसे, मोबाइल, कटावणी, कोयता असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी साथीदार तिलकसिंग, रामजितसिंग, करणसिंग, अक्षयसिंग तसेच कणवरसिंग यांच्या मदतीने शहर व परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार युनिट पाचच्या पथकाने रामजितसिंग, कणवरसिंग यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी संगनमताने पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्यातील विविध भागात घरफोडी केल्याचे कबूल केले.

आरोपींकडून पोलिसांनी ८० लाख १५ हजारांचे दागिने, ७८ हजारांची चांदी आणि इतर मुद्देमाल असा तब्बल १ कोटी २२ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहीरट, खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे अशोक इंदलकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अजितकुमार पाटील, राजेंद्र पाटोळे, विकास जाधव, शाहीद शेख, अंमलदार संतोष क्षीरसागर, संजय भापकर, सयाजी चव्हाण, किरण ठवरे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, निखिल जाधव, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्यासह पथकाने केली.

Web Title: As many as 173 burglary gangs jailed in Pune district 1 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.