झोपण्याच्या कारणातून वाद; एका वॉचमनने दुसऱ्याचा गमछाने गळा आवळून केला खून, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:28 IST2026-04-13T18:27:28+5:302026-04-13T18:28:43+5:30
गळा आवळून खून केला, थोड्या वेळाने भानावर आलेल्या त्या वॉचमनला आपण काय कृत्य केले, याची कल्पना आली

झोपण्याच्या कारणातून वाद; एका वॉचमनने दुसऱ्याचा गमछाने गळा आवळून केला खून, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : मध्यरात्री दोन वॉचमनमध्ये झोपण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात एका वॉचमनने दुसऱ्या वॉचमनचा गमछाने गळा आवळून खून केला. त्यानंतर, खून करणाऱ्यानेच पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची ही माहिती दिली. पांडुरंग भाऊराव खारवणे (वय. ५२, रा.म्हसोबा वस्ती मांजरी) असे खून झालेल्या वॉचमनचे नाव आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी सुदर्शन माणिक काळे (वय २२, रा.तुळजाभवानीनगर खराडी) आला अटक केली आहे.
याबाबत पांडुरंग यांचा मुलगा बाळू (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) पहाटे अडीचच्या सुमारास स्पॅनोलाइफ सोसायटी, स्वीट इंडिया चौक, खराडी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शन काळे आणि खून झालेली व्यक्ती पांडुरंग खारवणे हे दोघे खराडी येथील स्पॅनोलाइफ सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. सोमवारी मध्यरात्री दोघांत झोपण्याच्या कारणातून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, काळे याने खारवणे यांच्या डोक्याला बांधलेला गमछा घेऊन त्यांचा गळा आवळला. त्यामध्ये पांडुरंग यांचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळाने भानावर आलेल्या काळे याने आपण काय कृत्य केले, याची त्याला कल्पना आली. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली. तत्काळ खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार, काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने झोपण्याच्या कारणातून झालेल्या वादात पांडुरंग यांचा खून केल्याचे सांगितले. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, साहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक पोटे करत आहेत.