पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची घटना कोंढवा भागात सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. मल्लेश कुपिंद्र कोळी (३२, रा. आर. के. काॅलनी, गोकुळगनर, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बारिश उर्फ बाऱ्या संजय खुडे (२१, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कोंढवा खुर्द) आणि आकाश सुभाष मानकर (२३, रा. आर. के. काॅलनी, गोकुळनगर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लेश कोळी आणि आरोपी बारिश खुडे, आकाश मानकर ओळखीचे आहेत. सोमवारी (दि. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोंढव्यातील दशक्रिया विधी घाटावर तिघेजण दारू पीत होते. दारू पिताना त्यांच्यात वाद झाला. वादातून दोघांनी मल्लेशला काठीने बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला. मारहाणीत मल्लेश गंभीर जखमी झाला.
आरोपी तेथून पसार झाले. घाटावर जखमी अवस्थेत पडलेल्या मल्लेशला नागरिकांनी पाहिले. या घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना कळविण्यात आली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, कोंढवा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून रात्री उशिरा आरोपी खुडे आणि मानकर यांना अटक केली. दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक गावडे पुढील तपास करत आहेत.