वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 02:25 IST2019-02-18T02:25:20+5:302019-02-18T02:25:39+5:30
१ कोटी ७० लाख लाचेचे प्रकरण

वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला
पुणे : पर्वती येथील जमिनीसंदर्भात तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर, वकिलाच्या मार्फत १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे़ त्यामुळे त्यांना आता कधीही अटक होऊ शकते़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या गुन्ह्यात कट रचण्यात सहभागी असल्याने १२० बी हे कलम लावून वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अॅड़ रोहित शेंडे याला २६ डिसेंबर रोजी १ कोटी ७० लाख रुपये घेताना सापळा रचून अटक केली होती़ त्यानंतर वानखेडे यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती़ ज्या कॉम्प्युटरवर हा निकाल टाईप करण्यात आला़, तो व कार्यालयातील अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे़ वानखेडे यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते फरार झाले होते़ त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे़ बाळासाहेब वानखेडे यांचा अटक पूर्व जामीन फेटाळल्याने त्यांना अटक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पथक त्यांचा शोध घेत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी सांगितले़