पुणे : शहरातील रेडलाइट भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी केलेल्या छाप्यात खळबळजनक प्रकार उघडकीस आला. कारवाईदरम्यान चार अल्पवयीन मुलींना एका गुप्त खोलीत बंद करून ठेवण्यात आल्याचे समोर आले. खोलीच्या दरवाजाला मोठे कुलूप असल्याने पोलिसांना संशय आला आणि दरवाजा उघडताच आत या मुली आढळल्या.
छाप्यात ग्राहक व अन्य महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र चारही अल्पवयीन मुलींना मुद्दाम लपवण्यात आले होते. चौकशीदरम्यान संबंधितांनी खोलीत जुने सामान असल्याचे कारण देत कुलूप लावल्याचे सांगितले. पोलिसांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला असता, आत मुली सापडल्या. या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवातीला दोन मुलींनी नकार दिला होता. आता उर्वरित दोघींच्या कथित पालकांनीही तपासणीस विरोध केला आहे. त्यामुळे पोलिसांनी चाइल्ड वेलफेअर कमिटी (सीडब्ल्यूसी)कडे वैद्यकीय तपासणीसाठी परवानगी मिळावी, यासाठी पत्र पाठवले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मुलींचा दावा करणाऱ्यांकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. कथित पालकांचे हावभाव, नावे व मुलींसोबतचे साम्य संशयास्पद वाटत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. चारही मुली बुधवार पेठेतील एका शाळेत शिकत असल्याचे समोर आले असले, तरी त्यांच्याकडे शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नाहीत. मुलींचे समुपदेशन सुरू असून, त्यांना वैद्यकीय तपासणीस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी मानवी तस्करीसह अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत दोन बांगलादेशी महिला बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे आढळले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आधार कार्ड बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांकडून बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या टोळीचाही शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, बुधवार पेठेत सुरू असलेल्या अवैध व्यवसायाला काही पोलिस कर्मचारी संरक्षण देत असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली आहे. नियमित वसुली करणारे तसेच केवळ दिखाऊ छापे टाकणारे कर्मचारीही रडारवर असल्याचे समजते. एकाच ठिकाणी दीर्घकाळ बदली न झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचाही आढावा घेतला जात असून, संबंधित दलालांशी संपर्कात असलेल्यांची चौकशी सुरू आहे. बुधवार पेठेतील कारवाई नंतर वरिष्ठ पातळीवर संपूर्ण प्रकरणाची तपासणी वेगाने सुरू आहे.
Web Summary : Pune police discovered four underage girls hidden in a secret room during a raid in Budhwar Peth. Authorities suspect human trafficking and are investigating potential police involvement in illegal activities. Two Bangladeshi women were arrested with fake Aadhar cards.
Web Summary : पुणे पुलिस ने बुधवार पेठ में छापे के दौरान एक गुप्त कमरे में छिपी चार नाबालिग लड़कियों को खोजा। अधिकारियों को मानव तस्करी का संदेह है और वे अवैध गतिविधियों में संभावित पुलिस की संलिप्तता की जांच कर रहे हैं। दो बांग्लादेशी महिलाओं को नकली आधार कार्ड के साथ गिरफ्तार किया गया।