पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडताना आणखी एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:58 IST2025-05-01T13:57:48+5:302025-05-01T13:58:11+5:30
तीन महिन्यांपूर्वी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा येथेच अपघातात मृत्यू झाला होता

पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडताना आणखी एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले
यवत : पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडताना आणखी एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा येथेच अपघातातमृत्यू झाला होता. बुधवारी (दि. ३०) रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या दरम्यान एक ज्येष्ठ व्यक्ती महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील आयशर टेम्पोने ज्येष्ठ व्यक्तीला अक्षरशः चिरडले.
रघुनाथ सोपान खैरे (वय ७७, रा. लडकतवाडी, ता. दौंड) हे महामार्ग ओलांडत असताना सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोने (क्रमांक एमएच ०३ इएस ३६९६) त्यांना चिरडले. अपघातानंतर टेम्पो तसाच निघून गेला. ज्येष्ठ व्यक्तीचा टेम्पो खाली येऊन भयानक पद्धतीने मृत्यू झाला. सकाळची वेळ असल्याने यवत स्टँडवर गर्दी होती. हा भयानक अपघात बघून सगळ्यांचेच मन हेलावून जात होते. यवत येथे महामार्ग ओलांडण्यासाठी चुकीच्या ठिकाणी भुयारी मार्ग केल्याने मुख्य लेनवरून महामार्ग ओलांडावा लागतो. तसेच बस थांबादेखील मुख्य मार्गिकेवर आहे. यामुळे महामार्ग ओलांडताना आजपर्यंत कित्येक जणांचा बळी गेला आहे.