Animal wealth in danger zone due to constant rainfall | सततच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पशुधन धोक्यात
सततच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पशुधन धोक्यात

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष; पंचनाम्याची प्रतीक्षा

नीरा : जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली खूप दिवस लांबलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेती वाहून गेली. आलेलं पीकही गेलं, शासनाने त्याचे पंचनामे केले. मात्र याचबरोबर शेतकऱ्यांचे पशुधन ही धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुटरोट या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे मेंढपाळाच्या कळपातील अनेक शेळ्यामेंढ्या बाधित झाल्या असून नीरा परिसरातील राख, नावळी, गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी आदी भागातील मेंढपाळांच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत तर काही मेंढपाळांनी आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागली आहेत. यामुळे येथील मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अशा प्रकारचे आजार या जनावरांना होत असतात. यामध्ये जनावरांच्या पायांना जखमा होतात. या जखमा सतत वाढत गेल्यास जनावरांना चालता येत नाही. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यावर परिणाम होतो. पर्यायाने आजार बळावर गेल्यास उपासमार होउन अशी जनावरे मृत्युमुखी पडतात. शासनाच्या वतीने या काळात खबरदारी घेऊन लोकांचे नुकसान होऊ नये, म्हणून उपाययोजना करणे गरजेचे असते. मात्र मेंढपाळांना याबाबत काहीच माहिती नसल्याने ते मेडिकलमधून औषध आणून स्वत:च औषधोपचार करतात. काही लोकांनी लाळ आजार समजून औषध उपचार केले. 
मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे अनेकांना आपल्या कळपातील दहा ते वीस बकरी गमवावी लागली. याबाबत पोलीस पाटील दीपक जाधव यांनी पशुवैद्यकीय विभागाची संपर्क साधून उपाययोजना करण्याचे कळवले. यानंतर गुळूंचे येथील पशुवैद्यकीय अधिकाºयांनी धनगरपाड्यावर जाऊन पाहणी केली असता हा लाळ किंवा खुरवंत रोग नसून तो एक संसर्गजन्य आजार असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य उपचार घेतल्यास हा आजार लगेच बरा होतो, असे त्यांनी सांगितले........


गुळूंचे आणि परिसरातील अनेक मेंढपाळ आपल्या मेंढ्या विक्रीस घेऊन जाताना पाहिले. त्यावेळी चौकशी केली असता पावसाने मेंढीला रोग आला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण कवडीमोल भावाने मेंढे विकत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क करून याबाबत माहिती दिली असतात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून रोगनिदान केले आहे.- दीपक जाधव, पोलीस पाटील, गुळूंचे
......
प्रामुख्याने या भागातील मेंढ्यांना हा संसर्गजन्य आजार झाला आहे. यामध्ये शेळ्यामेंढ्या सतत पावसात भिजत असतात. त्यांचे पाय सतत ओले असतात त्यामुळे त्यांच्या नखातील कातडी मऊ होते. यामध्ये जंतुसंसर्ग होतो. त्याचबरोबर कातडीला लाकडे किंवा गवत पोचल्याने जखमा होतात. या भागात या जनावरांना झालेला रोग हा लाळ नसून फुटरोट हा जिवाणूचा विषाणूवन्य आजार आहे. शासकीय दवाखान्यात याबाबतची औषधे उपलब्ध असून मेंढपाळांनी औषध घ्यावीत.- डॉ. प्रकाश सूर्यवंशी, पशुवैद्यकीय अधिकारी.

Web Title: Animal wealth in danger zone due to constant rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.