ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली पुण्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:48 IST2026-02-10T13:47:35+5:302026-02-10T13:48:37+5:30

आरोपींनी ज्येष्ठाचा विश्वास संपादन करून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले आणि एक बनावट लिंक डाउनलोड करण्यास सांगितले

An 85-year-old senior citizen from Pune was cheated of Rs 22 crores in the name of online trading. | ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली पुण्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणूक

ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली पुण्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणूक

पुणे: बनावट शेअर्स ट्रेडिंगच्या माध्यमातून तब्बल २२ कोटींहून अधिक रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, ही कारवाई अंबरनाथ (ठाणे) आणि छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली.

पुण्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटी ३ लाख २२ हजार ७४२ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६ (५), ३१९ (२), ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला २७ नोव्हेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत शेअर बाजारातील मोठ्या नफ्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी विश्वास संपादन करून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले आणि एक बनावट लिंक डाउनलोड करण्यास सांगितले. या बनावट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगसाठी १९ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, गुंतवणुकीवरील कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

तपासादरम्यान केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून फसवणुकीची रक्कम अनेक बँक खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. ही खाती मुनिलकुमार सुरेंद्रसिंह (५१, अंबरनाथ), आकाश चंद्रशेखर मराठे (२७), लाला केशव उमाप (२६) आणि परमेश्वर दिलीप दाभाडे (२३, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या नावावर असल्याचे आढळून आले. सायबर पोलिसांच्या दोन स्वतंत्र पथकांनी अंबरनाथ आणि छत्रपती संभाजीनगर येथे धडक कारवाई करत चारही आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख आणि उपआयुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे व त्यांच्या पथकाने केले. 

Web Title : पुणे: ऑनलाइन ट्रेडिंग घोटाले में 85 वर्षीय नागरिक को ₹22 करोड़ का चूना

Web Summary : पुणे पुलिस ने एक गिरोह का पर्दाफाश किया जिसने एक 85 वर्षीय पुणे निवासी को नकली ऑनलाइन ट्रेडिंग के माध्यम से ₹22 करोड़ का चूना लगाया। घोटाले के सिलसिले में चार लोगों को गिरफ्तार किया गया है, जिसमें पीड़ित को उच्च रिटर्न का लालच देना और नकली ऐप्स का उपयोग करना शामिल था।

Web Title : Pune: Senior Citizen Duped of ₹22 Crore in Online Trading Scam

Web Summary : Pune police busted a gang that defrauded an 85-year-old Pune resident of ₹22 crore via fake online trading. Four individuals have been arrested in connection with the scam, which involved luring the victim with high returns and using fake apps.