पुणे : कर्वेनगर येथील एका नामांकित शाळेत ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश (पाॅक्सो) कविता शिरभाते यांनी फेटाळला. आरोपी हा एक शिक्षक असून, त्याने विद्यार्थ्याबरोबर केलेले कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे आरोपी जामिनास पात्र नाही, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने अर्ज नामंजूर केला.
मंगेश रमेश साळवे असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका नामांकित शाळेत आरोपी मंगेश साळवे हा नृत्य शिक्षक म्हणून काम करायचा. नृत्य शिकवत असताना आरोपी हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हात लावत असे. एका ११ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशनादरम्यान सांगितला. त्यानंतर त्याने आई-वडिलांनादेखील याबाबतची माहिती दिली. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यानंतर नृत्य शिक्षकाला अटक करण्यात आली. आरोपी हा डिसेंबर २०२४ पासून कारागृहात आहे. त्यामुळे आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, आरोपीच्या जामीन अर्जाला सरकारी वकील नितीन कोंघे यांनी विरोध केला. या प्रकरणात चार पीडित विद्यार्थी आहेत. आरोपीने पीडित मुलांवर लैंगिक अत्याचार केला होता. तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे. या प्रकरणात कोणताही विलंब झालेला नाही. आरोपीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. जरी तपास पूर्ण झाला असला तरी गुन्हा खूप गंभीर स्वरूपाचा आहे. म्हणून आरोपीला जामिनावर सोडण्यात येऊ नये असा युक्तिवाद कोंघे यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.