शंभर देशांच्या राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 19:41 IST2020-11-27T19:39:55+5:302020-11-27T19:41:21+5:30
तब्बल शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला 4 डिसेंबर रोजी भेट देणार होते.

शंभर देशांच्या राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द
पुणे : कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला 4 डिसेंबर रोजी भेट देणार होते. परंतु राजदूतांचा हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. दौरा निश्चित झाल्यावर पुन्हा कळविण्यात येईल असे लेखी पत्र आले असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत संशोधित होणाऱ्या कोरोनावरील लसीच्या उत्पादनाचे हक्क पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने मिळवले आहेत. ऑक्सफोर्डच्या लसीच्या प्राथमिक चाचण्या समाधानकारक आल्या आहेत.त्यामुळे लस उत्पादनाची जगातली सर्वात मोठी क्षमता असल्याने 'सीरम'कडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत येत्या 4 डिसेंबर रोजी पुणे दौ-यावर येणार होते. राजदूत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवार (दि.28) रोजी तातडीने पुणे दौऱ्यावर येत असून, सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीचे उत्पादन व वितरण याचा आढावा घेणार आहेत. परंतु आता राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द झाला आहे.