आश्चर्यकारकच म्हणायला हवं! शिक्रापुरात आढळली चार पायांची कोंबडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:05 IST2025-11-17T16:04:47+5:302025-11-17T16:05:50+5:30
हा प्रकार जनुकीय बदलामुळे होतो आणि याला पॉलिमेलिया ही जन्मजात स्थिती म्हणतात असे पशुवैद्यकीयांनी सांगितले

आश्चर्यकारकच म्हणायला हवं! शिक्रापुरात आढळली चार पायांची कोंबडी
शिक्रापूर : येथे एका चिकन व्यावसायिकाच्या दुकानात चार पायांची कोंबडी आढळून आली असून नागरिक ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. सिकंदर शेख यांचा येथे चिकन व्यवसाय आहे. त्याच्या दुकानात दररोज सकाळच्या सुमारास कोंबड्या येत असतात. सिकंदर शेख सकाळी दुकान उघडून कोंबड्यांना खाद्य देत असताना त्यांना अचानक कोंबडीला जास्त पाय असल्याचे दिसले.
सेवानिवृत्त सहायक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. राजेंद्र त्र्यंबके, प्राणी मित्र अमोल कुसाळकर, गणेश टिळेकर, शुभांगी टिळेकर यांसह अनेक पक्षी आणि प्राणी मित्रांनी सदर कोंबडीची पाहणी केली. त्यात एका कोंबडीला पूर्णपणे वाढलेले चार पाय होते आणि चारही पायांवर स्वतंत्र नखे होते, ज्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत बोलताना, सेवानिवृत्त सहायक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले की हा प्रकार जनुकीय बदलामुळे होतो आणि याला पॉलिमेलिया ही जन्मजात स्थिती म्हणतात. चार पायांची कोंबडी असल्याची बातमी सोशल मीडियावर प्रसारित होताच अनेक लोक ती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.