प्रारूप मतदार यादीत 'घोळ'; अजित पवारांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:24 IST2025-10-12T13:24:16+5:302025-10-12T13:24:25+5:30
अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन; दुरुस्तीची मागणी

प्रारूप मतदार यादीत 'घोळ'; अजित पवारांना निवेदन
आळंदी : आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी जाहीर झालेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार, प्रभागांनुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या यादीत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि गंभीर त्रुटी असल्याच्या तक्रारी नागरिक आणि इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मतदारांनी आपल्या आणि कुटुंबीयांच्या सदस्यांच्या नावांची पडताळणी केली असता, नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे दिसून आले आहे. काही नागरिकांनी त्यांची नावे आळंदी शहराच्या हद्दीबाहेरही आढळल्याची तक्रार केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना त्यांच्या प्रभागातील स्थानिक मतदार इतर प्रभागांत गेल्याचे आढळले असून, काही प्रभागांतील मतदारसंख्या अत्यल्प किंवा असामान्यरित्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी स्थानिक मतदारांची नावे त्यांच्या वास्तव प्रभागाऐवजी इतर प्रभागांत समाविष्ट झाली आहेत. यामुळे मतदारांना योग्य प्रभागात मतदानाचा हक्क बजावण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन...
या गंभीर त्रुटींविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शहर आळंदीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रारूप यादीवरील कार्यवाही तत्काळ थांबवावी. प्रत्येक प्रभागातील मतदार याद्यांची पुन्हा स्थळ पडताळणी करावी. नागरिकांकडून एकत्रित स्वरूपात आलेले आक्षेप फॉर्म स्वीकारावेत. नगर परिषद प्रशासनाने पक्षपातपूर्ण भूमिका घेऊ नये, याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी ८ ते १३ ऑक्टोबर २०२५ असा आहे. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी नगर परिषदेचे कार्यालय सुरूच ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मतदारांच्या हरकती व सूचनानुसार स्थळ पाहणी करून मतदार याद्यांमध्ये बदल करण्यात येईल. - माधव खांडेकर, मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद