अक्षय भिसे खून प्रकरण: पोलिसांनी दोन आरोपींना सोलापुरातून ताब्यात घेत ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 08:36 IST2022-08-26T08:35:43+5:302022-08-26T08:36:13+5:30
रविवारी सकाळी कचरा वेचकाचा गोळ्या झाडून खून केला होता...

अक्षय भिसे खून प्रकरण: पोलिसांनी दोन आरोपींना सोलापुरातून ताब्यात घेत ठोकल्या बेड्या
पुणे : खराडी परिसरात रविवारी सकाळी कचरा वेचकाचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने दोघांना सोलापूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संतोष सत्यवान शिंदे (वय २८, सध्या रा. सराफा बाजार, जि. बिदर, राज्य कर्नाटक) आणि संग्राम उर्फ बाबू राजू बामणे (दोघेही मूळ रा. मु. पो. कान्हापुरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
अक्षय प्रकाश भिसे (वय २६, रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष सोने वितळविण्याच्या कारखान्यात, तर बामणे हा टेंभुर्णीतील हॉटेलमध्ये मॅनेजरचे काम करतो. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अक्षय भिसे यांचा २१ ऑगस्ट रोजी गोळ्या झाडून खून केला होता. याचा गुन्हे शाखेच्या युनिट ४ कडून समांतर तपास सुरू होता. यासाठी २ पथके तयार केली होती. त्यापैकी एका पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दुसऱ्या पथकाने अक्षयच्या नातेवाइकांकडे, मित्रांकडे चौकशी केली. दोन्ही पथके सोलापूर येथील टेंभुर्णी येथे संशयित आरोपींचा माग काढत पोहचले.
संतोष शिंदे हा गुन्हा घडण्यापूर्वी व त्यानंतर खून झालेल्या अक्षयच्या व त्याच्या नातेवाइकांच्या संपर्कात होता. तो अक्षयच्या नातेवाइकांकडून पोलिसांच्या हालचालीची माहिती घेत होता. तसेच गुन्हा केल्यानंतर तो गुन्ह्यात वापरलेली दुचाकी घेऊन त्याचा मित्र संग्राम बामणे असलेल्या सागर लॉजवर आला होता. ते घटनेच्या रात्री दुचाकीवर पुण्याच्या दिशेने गेले होते. त्याचाच माग काढत युनिट ४ ने दोघांना सोलापूर येथून बेड्या ठोकल्या.
प्रेमसंबंधातील अडसर दूर करण्यासाठी खून
संतोष शिंदे याचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. परंतु, तिचे लग्न झाल्यानंतर अक्षय हा प्रेमसंबंधातील अडसर ठरत होता. तिनेही लग्न झाल्यानंतर संतोषशी असलेले संबंध तोडले होते. हा अडसर दूर केला तर संबंधित महिला आपल्याशिवाय दुसरीकडे कुठे जाईल, असा त्याचा समज झाला होता. त्यामुळे अक्षयचा कायमचा काटा काढण्यासाठी संतोष याने त्याचा साथीदार बामणे यांच्या मदतीने कट रचून खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.