पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातले हरहुन्नरी नेते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार होय. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजितदादांनी तब्बल ७ वेळा बारामतीचे आमदारपद भूषवलं आहे. तर या राजकीय कारकिर्दीत त्यांना खासदार होण्याचीही संधी मिळाली आहे. परंतु ते खासदार झाल्यानंतर अवघ्या तीन - चार महिन्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला असल्याची माहिती आहे. अजित पवारांनी पवारांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर १९९१ साली ते पहिल्यांदा खासदार झाले होते.
अजितदादांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 'देवळाली-प्रवरा' या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत. अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. त्यांच्याकडे बी. कॉम. ही पदवी आहे.
अजितदादांनी काकांसाठी दिला राजीनामा...
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पाच वर्षे पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळून राजीव गांधी राजकारणात स्थिर होत होते. १९७८ ला काँग्रेसमधून बंड करून बाहेर गेलेले शरद पवार हे राजीव गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसमध्ये परतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. अशातच १९९० साली राजकारणात उलथापालथ व्हायला सुरुवात झाली. व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांची केंद्रातील सरकारे एकामागोमाग एक कोसळली. दरम्यान राजीव गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसच्या सत्तेची धुरा पी. व्ही. नरसिंह राव यांच्या खांद्यावर आली. पी. व्ही. नरसिंह राव यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर असलेल्या शरद पवारांना संरक्षणमंत्रिपद देत केंद्रात बोलावलं. केंद्रात जायचं म्हटल्यावर संसदेचा सदस्य असणं आवश्यक होतं. मग शरद पवारांसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणजे बारामती होता आणि तिथून तीन -चार महिन्यापूर्वीच अजित पवार निवडून गेले होते. मात्र, काका शरद पवारांसाठी अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला. अगदी तीन-चार महिनेच दिल्लीत राहून परतलेले अजित पवार त्याच वर्षी म्हणजे १९९१ सालीच बारामती मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार झाले. तेव्हपासून 35 वर्षांहून अधिक काळ अजित पवार बारामतीतून आमदार होते.
Web Summary : Ajit Pawar, Baramati's long-time MLA, once resigned his MP seat for his uncle, Sharad Pawar, to enter central politics as Defence Minister in 1991. He then became Baramati's MLA.
Web Summary : अजित पवार, बारामती के लंबे समय तक विधायक, ने एक बार अपने चाचा शरद पवार के लिए अपनी सांसद सीट से इस्तीफा दे दिया, ताकि वे 1991 में रक्षा मंत्री के रूप में केंद्रीय राजनीति में प्रवेश कर सकें। फिर वे बारामती के विधायक बने।