Ajit Pawar Passes Away: अजित पवार म्हणाले होते “आता भेट होणार नाही” आणि तेच घडलं; प्रफुल्ल पटेल यांची हृदयद्रावक प्रतिक्रिया
By किरण शिंदे | Updated: January 29, 2026 09:31 IST2026-01-29T09:29:11+5:302026-01-29T09:31:19+5:30
Ajit Pawar Passes Away अजितदादा हे अतिशय धडाडीचे, स्पष्टवक्ते आणि लोकप्रिय नेते होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची प्रचंड ख्याती होती. ते आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही

Ajit Pawar Passes Away: अजित पवार म्हणाले होते “आता भेट होणार नाही” आणि तेच घडलं; प्रफुल्ल पटेल यांची हृदयद्रावक प्रतिक्रिया
पुणे : मंगळवारी साडेआठ वाजता अजितदादा आणि आमचं फोनवर बोलणं झालं होतं. ते नेहमीप्रमाणे खुशमीसाज होते. काही वेळ कामाबाबत चर्चा झाली. पण शेवटी शेवटी त्यांनी म्हटलं ‘प्रफुल, आता आपली भेट होणार नाही… मी आठ-दहा दिवस बाहेर आहे.’ आणि अक्षरशः तसंच झालं…” राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही भावूक प्रतिक्रिया दिली. बोलताना त्यांचा आवाज भरून आला होता आणि डोळ्यांत अश्रू तरळत होते.
बुधवारी सकाळी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले, “अजितदादा हे अतिशय धडाडीचे, स्पष्टवक्ते आणि लोकप्रिय नेते होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची प्रचंड ख्याती होती. ते आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही.” अपघातस्थळाची पाहणी केल्याची माहिती देताना त्यांनी सांगितलं, “आम्ही हेलिकॉप्टरने अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. बारामती विमानतळाची धावपट्टी उंचावर आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. मात्र अपघाताच्या दिवशी सकाळी परिसरात दाट धुके होतं. विमानाने दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात असताना हा भीषण अपघात झाला. ही फार मोठी दुर्घटना असून महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे.”
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे. विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक बारामतीत दाखल होत असून अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लाखो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.