Ajit Pawar Passed Away : तरुण नेत्यांना मोठे करणाऱ्या विकासपुरुषाचा अधुरा वादा; अजितदादांच्या जाण्याने भोर तालुक्यात शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:36 IST2026-01-28T17:35:41+5:302026-01-28T17:36:04+5:30
- कार्यकर्ते हळहळले, भोर तालुक्याशी अजित पवार यांचे १९९० पासून जिव्हाळ्याचे संबंध होते.

Ajit Pawar Passed Away : तरुण नेत्यांना मोठे करणाऱ्या विकासपुरुषाचा अधुरा वादा; अजितदादांच्या जाण्याने भोर तालुक्यात शोककळा
भोर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनाने भोर तालुक्यावर गाढ शोककळा पसरली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत जनतेशी नाळ जोडणारे, तरुणांना हवेहवेसे वाटणारे नेतृत्व गमावल्याने तालुक्यातील जनता हळहळत आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने दुखवटा पाळला आणि श्रद्धांजली अर्पण केली.
भोर तालुक्याशी अजित पवार यांचे १९९० पासून जिव्हाळ्याचे संबंध होते. तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विशेषतः तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला वडगावडाळ-उत्रोली येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द त्यांनी निवडणुकीत दिला होता. मात्र अकाली जाण्यामुळे हा वादा अधुरा राहिला की काय, अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
भोर तालुक्यातील अनेक नेत्यांना राजकीय पदे देऊन अजित पवार यांनी मोठे केले. भोर शहरात माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ (कै. माधवराव टापरे) यांना राज्य सहकारी बँकेचे संचालक-अध्यक्षपद दिले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून माजी आमदार कै. संपतराव जेधे, कै. धैर्यशील खोपडे, भालचंद्र जगताप, रेवननाथ दारवटकर यांना संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्षपदे दिली. रणजित शिवतरे यांना वडिलांच्या निधनानंतर तरुणपणातच भोर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष बनवले. जिल्हा परिषद उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यांना बांधकाम समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्षपद दिले. चंद्रकांत बाठे यांना जिल्हा परिषद सदस्य, विक्रम खुटवड यांच्या माध्यमातून युवकांना विधानसभा उमेदवारी दिली. राजकीय पदांसोबत आर्थिक पाठबळ देऊन नेत्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच मागील पंधरा वर्षांपासून भोर तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता कायम आहे.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर भोर तालुक्यात प्रथमच काशिनाथराव खुटवड आमदार म्हणून विजयी झाले. तब्बल २५ वर्षांनंतर २०२४ मध्ये शंकर मांडेकर आमदार झाले. तालुक्यातील अनेक नेते-तरुणांना राजकारणात आणून विविध पदांवर बसवले. भोर तालुक्यात राष्ट्रवादीच्या जडणघडणीत अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. तळागाळातील ग्रामीण भागापासून शहरापर्यंत त्यांना मानणारे कार्यकर्ते आजही कार्यरत आहेत.
भोरमधील उत्रोली येथे अजित पवार यांचे नातेवाईक होते. माजी सभापती कै. आप्पासाहेब शिवतरे व माजी उपसभापती कै. शिवाजीराव शिवतरे यांच्या घरातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या काकू नंदा विठ्ठल शिवतरे या अजित पवार यांच्या मामाची मुलगी होत. यामुळे शिवतरे वाड्यावर त्यांचे जाणे-येणे होते. राजकारणाबरोबर नातेवाइकांना जपत होते. रणजित शिवतरे यांच्या वडिलांच्या निधनानंतर अजित पवार यांनी त्यांना राजकारणात आणले आणि महत्त्वाची पदे दिली.
"माझ्या वडिलांच्या निधनानंतर अजितदादांनी मला राजकारणाचा गंध नसताना भोर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्षपद दिले. २००७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली, विजय झाल्यानंतर बांधकाम समिती सभापतीपद, २०१७ मध्ये पुन्हा उमेदवारी आणि उपाध्यक्षपद. राजकारणात आहे ते केवळ आमचे दैवत असलेल्या अजितदादांमुळे. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे न भरून येणारे नुकसान झाले आहे." -रणजित शिवतरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
"अजितदादा म्हणजे केवळ एक नाव नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक दरारा होता. पहाटेच्या वेळी कामाला सुरुवात करणारा, फाइल्सचा वेगाने निपटारा करणारा आणि शब्दाचा पक्का असलेला लोकनेता आज आपल्यात नाही. ही कल्पनाच करवत नाही." -कुलदीप कोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य