Ajit Pawar Passed Away : मोठा स्फोट झाला नंतर कळालं त्यात दादा आहे...; ग्रामस्थांनी सांगितलं नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:43 IST2026-01-28T15:39:31+5:302026-01-28T15:43:07+5:30
या अपघातात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह पीएसओ विदिप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे.

Ajit Pawar Passed Away : मोठा स्फोट झाला नंतर कळालं त्यात दादा आहे...; ग्रामस्थांनी सांगितलं नेमकं काय घडलं ?
बारामती : गाेजुबावी (ता. बारामती) येथे चार्टर्ड विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडली. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामतीच्या इतिहासातील बुधवार हा ‘काळा दिवस’ ठरला आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह पीएसओ विदिप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
या अपघातावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी लोकमतशी बोलतांना नेमकं काय घडले यांची सविस्तर माहिती दिली आहे. गोजुबावी गावातील ग्रामस्थ राघू मारोती आटोळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले,'जनावरांना खायला नेत होतो. ८:४५ ला जोरात आवाज आला. १० किमी आवाज गेला असेल एवढा आवाज होता. जाळ खूप उंच होता. ५० फूट मागेच धूर आणि आगीमुळे आम्हाला थांबावे लागले. विमानाने २ घिरट्या मारल्या. पण दुसऱ्यांदा उतरतानाच ते अनियंत्रित झाल्याचे दिसून येत होते. जोरात विमान हालत होते. असेही राघू मारोती आटोळे यांनी सांगितले.
मोठा ब्लास्ट! अजित पवारांच्या विमान अपघाताचा भयावह सीसीटीव्ही फुटेज समोर..#Pune#CCTV#AjitPawar#PlaneCrashpic.twitter.com/tmANUfBe55
— Lokmat (@lokmat) January 28, 2026
दरम्यान, उर्मिला आटोळे म्हणाल्या, मी धुणं-भांडे करत होती. विमान अचानक खाली आले. क्षणात स्फोट झाला. आमच्या घरापर्यंत विमानाचे पार्ट आले. आम्ही आवाज आणि जाळ बघून घाबरून गेलो.
प्रत्यकदर्शी महिला अनिता राहुल आटोळे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले, सकाळी मुलांना शाळेत सोडायला निघाले होते. तेवढ्यात विमानाचे दोन राउंड झाले. त्यावेळी विमानाने दोन वेळा हेलकावे घेतला. विमान कोसळते काय असे आम्हाला वाटत होते. तेवढ्यात विमान खाली कोसळले आणि मोठा स्फोट झाला. त्यावेळी आगीच्या मोठ्या ज्वाला उडाल्या. विमान कोसळल्यानंतर कोणीही जिवंत नव्हते. पण त्यात दादा आहे हे मला माहीत नव्हतं.. नंतर कळले त्यात दादा आहे.. दादाचं असं व्हायला नको होतं.. दादा बारामतीच नाही तर राज्याची शान होते'