"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:22 IST2025-11-23T12:20:56+5:302025-11-23T12:22:16+5:30
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे एकसंघ दिसणाऱ्या महायुतीतील संघर्ष समोर येऊ लागले आहे. राज्यभरात महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे दिसत आहे. नेतेही मित्रपक्षावरच लक्ष्य करू लागले आहेत.

"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
"इथे जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार असले, त्यांचा आमदार इथे असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनाच मतदान करा", असे विधान भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यापासून सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांमध्येच घमासान सुरू आहे. नेत्यांच्या फोडाफोडीपासून सुरू झालेले हे शीतयुद्ध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
भोर नगरपालिकेची निवडणूक होत असून, चंद्रकांत पाटील प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपचे मोठा असल्याचे विधान अप्रत्यक्षपणे केले.
भोर नगरपालिकेत महायुतीतीलच दोन पक्षांमध्ये लढाई होत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये यानिमित्ताने राजकीय संघर्ष होताना दिसत आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "सध्या भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे जरी भाजपमध्ये आले असले, तरी सध्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर हे आहेत. त्यामुळे भोरमध्ये सत्ता जरी अजित पवार यांची असली, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच मतदान करा."
'ए आण रे त्याला उचलून', अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "जेव्हा आमचे दोन खासदार होते, तेव्हा आम्ही खचून गेलो नाही. आता तीन वेळा सत्तेत आलो म्हणून माजलो नाहीये. दुसरे सगळे पक्ष संपवून टाका. ए आण रे त्याला उचलून असे काही केलेले नाही. नेत्यांना, लोकांना वाटतंय की, भाजपचे भविष्य आहे म्हणून ते येत आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्या आल्या त्यांच्या राजगड साखर कारखान्याला मदत झाली. ती काँग्रेसमध्ये झाली नसती", असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला.
शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार फोडला
भोरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून भोर नगराध्यक्ष निवडणुकीत नितीन सोनावणे यांना उमेदवारी दिली गेली होती. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात घेतले. त्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यावरून स्थानिक पातळीवर महायुतीत घमासान सुरू आहे.