अजित पवारांचे निधन! बातमी कळताच युगेंद्र पवार ढसाढसा रडले, हसन मुश्रीफांनाही अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:47 IST2026-01-28T10:45:44+5:302026-01-28T10:47:35+5:30
Ajit Pawar Death: अजित पवार यांचा बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू

अजित पवारांचे निधन! बातमी कळताच युगेंद्र पवार ढसाढसा रडले, हसन मुश्रीफांनाही अश्रू अनावर
Ajit Pawar Death, Yugndra Pawar Hasan Musrif Cried: महाराष्ट्राच्या राजकारणात आजची सकाळ फारच वाईट झाली. सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या. त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. DGCAने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बारामती शोकसागरात बुडाले. युगेंद्र पवार आणि हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी भीषण अपघात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. सकाळी त्यांच्या विमानाने बारामती विमान तळावर लँडींग केले. पण लँडींग करत असताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला. यादरम्यान, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांची बातमी समोर येताच ते फोनवर बोलत असताना रडताना दिसले.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी अजित पवार यांनी जोर लावला होता. तसेच पुणे जिल्ह्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं.