अजित पवार यांचा बैठकांचा धडाका; दोन दादांच्या वादात कार्यकर्त्यांची कोंडी; कोणाचे ऐकायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 10:49 IST2023-08-28T10:48:26+5:302023-08-28T10:49:14+5:30

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अन् अजितदादांचा बैठकांचा धडाका सुरु

Ajit Pawar blast of meetings Dilemma of activists in the dispute between two grandfathers; Who to listen to? | अजित पवार यांचा बैठकांचा धडाका; दोन दादांच्या वादात कार्यकर्त्यांची कोंडी; कोणाचे ऐकायचे?

अजित पवार यांचा बैठकांचा धडाका; दोन दादांच्या वादात कार्यकर्त्यांची कोंडी; कोणाचे ऐकायचे?

राजू इनामदार 

पुणे: पालकमंत्रिपदाचा वाद तूर्त मिटला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील तिढा काही सुटायला तयार नाही. त्यातच अजित पवार यांनी मी मंत्री आहे, मलाही बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी वैतागले आहेत. कोणाचे ऐकायचे? असा प्रश्न वारंवार पडू लागल्याने प्रशासनही हवालदिल झाले आहे.

अजित पवार यांचा बैठकांचा धडाका

अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा दिल्यापासून लगेचच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. पवार यांच्या घरचा जिल्हा, पाटील कोथरुडमधून निवडून आले असले तरी मूळचे कोल्हापूरचे, त्यामुळेही फरक पडत आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे अशा जिल्ह्यातील दोन मोठ्या शहरांचे दौरे पवार यांनी केले. प्रशासनाच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. तसेही ते जुन्या विधानभवनात वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून तिथे त्यांच्या बैठका घेतच आहेत. पालकमंत्री असलेले चंद्रकात पाटील मात्र या बैठकांना नसतात. जिल्ह्यातील विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आता अजित पवार हेच बैठका घेतात, निर्णय घेतात, अधिकाऱ्यांना आदेश देतात, असे चित्र जिल्ह्यात तयार झाले आहे.

राजकीय संभ्रम

पत्रकारांनी एकदा पवार यांना विचारले असता त्यांनी, ‘मी मंत्री आहे, मलाही बैठक घेण्याचा अधिकार आहे’ असे दबंग उत्तर दिले. सत्तेत गेल्यानंतर ६५ दिवसांनी बारामतीत गेले असताना त्यांचे जे जंगी स्वागत झाले. त्यामुळेही भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धडकी भरली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षात फूट नाही, काही जणांनी वेगळा मार्ग निवडला, नेते शरद पवार हेच आहेत, अशी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये राजकीय गोंधळ निर्माण करत आहेत. संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर पाटील यांच्यासह भाजपचे आमदारही बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचा अनुभव

प्रशासनाकडे कामे घेऊन ते गेले तर त्यांच्याही आधी अजित पवार यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तिथे उपस्थित असतात. अधिकाऱ्यांकडून तेच काम करून घेतात. अधिकारी त्यांचेच ऐकतात. बदली करणे, बदली रद्द करणे, विकासकामांचे प्रस्ताव, त्यासाठीचा निधी, सरकारी योजनांची अंमलबजावणी अशा अनेक कामांमध्ये आता जिल्हा प्रशासनात अजित पवार यांचाच शब्द चालू लागला असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पालकमंत्री पाटील यांचे नाव सांगितले तरी, हे तर अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे किंवा पवार यांचा या कामाबाबत निरोप आहे, त्यामुळे आताच काही करता येणार नाही, असे अधिकारीच आम्हाला सांगतात, असा अनुभव काही भाजप पदाधिकाऱ्यांनी नोंदवला.

फडणवीसांकडे करणार तक्रार

पालकमंत्री पाटील यांची माणसे म्हणून काम करत असणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना याचा फटका बसू लागल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. एकतर ज्यांच्या विरोधात इतकी वर्षे पक्षाचे नाव घेत पाय रोवून उभे राहिलो त्यांच्याचबरोबर त्यांना बसावे, उठावे लागत आहे. तसे करताना अपेक्षित मान, सन्मान अजित पवार यांच्या माणसांकडून दिला जात नाही. साध्या किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्येही अजित पवार यांचेच कार्यकर्ते, पदाधिकारी कायम पुढे असतात, असे त्यांचे म्हणणे आहे. सगळे मिळून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संपर्क साधणार आहेत, असे समजते.

सर्व काम समन्वयाने सुरू 

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत व याच जिल्ह्याचे आहेत तर चंद्रकात पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्याचे प्रश्न सुटणे, हे जास्त महत्त्वाचे आहे व याची काळजी दोन्ही नेत्यांना आहे. सर्व काम समन्वयाने सुरू आहे. -मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, भाजप

 ते बैठका घेणारच

अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात बैठका घेऊ शकतात. पुणे जिल्हा तर त्यांचा स्वत:चा आहे. ते बैठका घेणारच. भाजप कार्यकर्त्यांनी त्यामुळे अस्वस्थ व्हावे, असे त्यात काहीही नाही. -दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

आमच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी

हा त्या दोघांचा अंतर्गत विषय आहे. भाजपनेच हा नवा संसार सुरू केला. त्यात त्यांची कुचंबणा होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आमचे आमच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम चालले आहे, त्यामुळे अशा गोष्टींवर काहीच बोलायचे नाही. -प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

Web Title: Ajit Pawar blast of meetings Dilemma of activists in the dispute between two grandfathers; Who to listen to?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.