प्रशांत जगतापांचे निकटवर्तीय अजित पवार गटात; राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख
By निलेश राऊत | Updated: July 7, 2023 17:55 IST2023-07-07T17:55:11+5:302023-07-07T17:55:19+5:30
प्रदीप देशमुख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून शहर प्रवक्ते म्हणून काम केले आहे

प्रशांत जगतापांचे निकटवर्तीय अजित पवार गटात; राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख यांना नियुक्त पत्र दिले.
प्रदीप देशमुख हे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच शहर प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नियुक्तीनंतर देशमुख म्हणाले, अजित पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहू. जनता आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून आपण काम करणार आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. त्याला अनुसरून सर्व घटकांसोबत संवाद ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.
कोण आहेत प्रदीप देशमुख
राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे निकटवर्तीय प्रदीप देशमुख होते. प्रशांत जगताप यांच्याकडून पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने उपक्रम, आंदोलने, कार्यक्रम घेतले जात असे. त्यावेळी प्रशांत जगताप यांच्याबरोबर देशमुख यांचाही परिपूर्ण सहभाग असायचा. त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून शहर प्रवक्ते म्हणून काम केले आहे.