अमोल कोल्हेंच्या उमेदवारीबद्दल अजित पवारांनी पाळले मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:52 IST2019-03-07T01:51:59+5:302019-03-07T01:52:14+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असताना ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी या संदर्भात सोईस्कर मौन पाळले.

अमोल कोल्हेंच्या उमेदवारीबद्दल अजित पवारांनी पाळले मौन
नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असताना ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी या संदर्भात सोईस्कर मौन पाळले. शिवसेनेतून ‘राष्ट्रवादी’त आलेल्या डॉ. कोल्हे यांचा त्यांचे जन्मगाव नारायणगाव येथे मंगळवारी (दि. ५) सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अजित पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.
या वेळी अजित पवार डॉ. कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करतील, अशी गावकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र पवारांनी डॉ. कोल्हेंच्या उमेदवारीबद्दलचा संभ्रम कायम ठेवला. ‘‘जुन्नरकरांच्या मनातील उमेदवार देण्यात येईल,’’ असे सांगून पवारांनी डॉ. कोल्हेंच्या उमेदवारीला बगल दिली. ‘स्टार प्रचारक’ म्हणून कोल्हेंवर राज्याची जबाबदारी टाकली जाणार असल्याचे पवारांनी सांगितले. पवारांच्या वक्तव्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी होती. डॉ. कोल्हेंना उमेदवारी जाहीर होईल, या अपेक्षेने गावकऱ्यांनी सत्कार कार्यक्रमाला गर्दी केली होती. मात्र या संदर्भात स्पष्टता न आल्याने गावकरी सभेनंतर नाराजी व्यक्त करून निघून गेले.
>टीका : पुरंदरला विमानतळ नेण्याचे काम कोणाचे?
‘‘पुरंदरला विमानतळ नेण्याचे काम कोणाचे आहे, बाह्यवळणाची कामे का बंद पडली आहेत,’’ असा सवाल पवारांनी केला. खेड ते सिन्नर रस्त्याचे १३८ किमी पैकी १०९ किमीचे काम झाले. २९ किमीचे काम अपूर्ण राहिले यास जबाबदार कोण, असेही पवारांनी विचारले. डॉ. कोल्हे यांनीही आढळराव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की शिवनेरीचा शिलेदार म्हणून १५ वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देता आला नाही.