Air Quality Pune : हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रणेची आकडेवारी संकेतस्थळावर जाहीर करा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:47 IST2025-01-01T10:36:45+5:302025-01-01T10:47:00+5:30

दररोज महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Air Quality Pune Publish air quality measurement data on the website. | Air Quality Pune : हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रणेची आकडेवारी संकेतस्थळावर जाहीर करा  

Air Quality Pune : हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रणेची आकडेवारी संकेतस्थळावर जाहीर करा  

पुणे : कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी सिटीकडून शहराच्या हद्दीत ४५ ठिकाणी बसविण्यात आलेल्या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रणेची जूनपर्यंतचीच माहिती उपलब्ध आहे. ही माहिती अद्ययावत का ठेवली जात नाही, ही यंत्रणा कुठे बसवली, त्याच्या दैनंदिन नोंदी कोण घेते, ही यंत्रणा खरोखरच सुरू आहे का, असे प्रश्न सजग नागरिक मंचाने उपस्थित करत यंत्रणेने मोजणी केलेली आकडेवारी दररोज महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

शहराच्या प्रदूषणाची स्थिती नागरिकांनाही कळल्यास नागरिकही प्रदूषण नियंत्रणासाठी हातभार लावतील, या उद्देशाने २०१५ नंतर पुणे स्मार्ट सिटीने शहरात ४५ ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसवली होती. वैकुंठ स्मशानभूमीमुळे फार प्रदूषण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींमुळे स्मशानभूमीपासून एक किलोमीटर परिसरात निवासी इमारतीवर पुणे स्मार्ट सिटीतर्फे दोन तपासणी यंत्रणा बसवण्यात आल्या होत्या. आता स्मार्ट सिटीकडील सर्वच यंत्रणा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

या यंत्रणेचे कामकाज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अखत्यारित आले आहे. या हवेच्या गुणवत्तेची दैनंदिन माहिती मिळण्यासाठी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे माहिती मागितली आहे. या विभागाकडे केवळ जून २०२४ पर्यंतचीच माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी कररूपाने भरलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून यंत्रणा बसवण्यात आलेली असताना माहिती अद्ययावत का ठेवली जात नाही, खरोखरच ही यंत्रणा सुरू आहे का, असे प्रश्न विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत. 

...तर उपाययोजना करता येतील

देशातील पहिल्या दहा वायुप्रदूषित शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. एकीकडे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका बांधकाम व्यावसायिकांवर बंधने घालत आहे, तर दुसरीकडे शहरांतील विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता काय आहे ही माहिती रोजच्या रोज अद्ययावत ठेवली जात नाही. महापालिका, वाहतूक पोलिस, नागरिकांना हवेच्या गुणवत्तेची माहिती दररोज उपलब्ध झाल्यास काही उपाययोजना करणे शक्य असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.

Web Title: Air Quality Pune Publish air quality measurement data on the website.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.