विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:09 IST2025-06-12T16:07:18+5:302025-06-12T16:09:51+5:30
विमान कोसळण्याच्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे

विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार
पुणे : गुजरातच्या अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्दैवी अपघात झाला. लंडनला जाणारे प्रवासी विमान विमानतळाजवळच कोसळले. समोर आलेल्या फोटोंमधून विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अहमदाबाद येथे विमान कोसळून हा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हिडीओही समोर येत आहेत. विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत. (Air India Ahmedabad Plane Crash)
सीआयएसएफच्या म्हणण्यानुसार, उड्डाण घेतल्यानंतर, विमान शहरातील एका निवासी भागातील एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर त्यात मोठी आग लागली. अपघातानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आहे. या हृदयद्रावक घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल प्रशासनाला युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना पवार यांनी केली आहे.