दीड महिन्यापूर्वी रचला हत्येचा कट; लुडो गेम खेळायला बोलवलं अन् थंड डोक्यानं काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:50 IST2025-03-18T15:49:21+5:302025-03-18T15:50:07+5:30

आरोपी गेल्या दीड महिन्यापासून माऊलीला संपविण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी माऊलीला बोलावून घेत त्याचा गळा दाबून खून केला.

ahilyanagar shrigonda A murder plot was hatched a month and a half ago invited to play Ludo game and coolly foiled it | दीड महिन्यापूर्वी रचला हत्येचा कट; लुडो गेम खेळायला बोलवलं अन् थंड डोक्यानं काढला काटा

दीड महिन्यापूर्वी रचला हत्येचा कट; लुडो गेम खेळायला बोलवलं अन् थंड डोक्यानं काढला काटा

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील तरुणाचा आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मयताचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी धारधार तलवारीने तुकडे करुन विहिरीत फेकले असल्याचे तपासात समोर आले आहे.

माऊली सतीश गव्हाणे (वय १९, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याच्या खूनप्रकरणी सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २० रा. दाणेवाडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ६ मार्चपासून बेपत्ता असलेल्या माऊलीचा मृतदेह १२ मार्चला सापडला. या खून प्रकरणातील आरोपी सागर गव्हाणे याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला २४ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

दरम्यान, मृतावर दाणेवाडी येथे सोमवारी सकाळी ११ वाजता वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काहीवेळ गावात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे गावातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, मृताच्या घराला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी कट रचून माऊली गव्हाणे याचा निघृणपणे खून केला. आरोपींनी दीड महिन्यांपूर्वीच खुनाचा कट रचला. होता. खून नाजूक कारणातून झाली असल्याची परिसरात चर्चा आहे. आरोपी गेल्या दीड महिन्यापासून माऊलीला संपविण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी माऊलीला बोलावून घेत त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तलवारीने तुकडे केले. शीर धडावेगळे करून एक हात व पाय तोडला. त्यानंतर मृतदेह एका पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला. हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

आरोपी परिसरातीलच, घटनेच्या वेळी उपस्थित 

माऊली गव्हाणे याच्या खुनातील आरोपी हे परिसरातील असावेत, असा पोलिसांचा संशय होता. तपासाअंती तो खरा ठरला. माऊली याचा खून त्याच्या परिचयातील असलेल्या दोघांनी केला. विशेष म्हणजे माऊलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढताना हे दोन्ही आरोपी तिथे उपस्थित होते. मात्र, पोलिस तपासात त्यांचे बिंग फुटले आणि दोघांच्या हातात बेड्या पडल्या.


गावकऱ्यांकडून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

माउली गव्हाणे अतिशय शांत मुलगा होता. त्याची या नराधमांनी विकृत पद्धतीने हत्या केली. या प्रकाराने दाणेवाडी गाव सुन्न झाले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


तिन्ही मोबाइल एकाच वेळी स्विच ऑफ

मयत व दोन आरोपींचे मोबाइल त्या रात्री एकाच वेळी स्विच ऑफ झाले. ही माहिती पोलिसांनी तांत्रिक स्थळावर शोधली. याच माहितीच्या आधारे पोलिसांना हत्येचा शोध चार-पाच दिवसांतच लावता आला.

लुडो गेम अन् हत्या..

सागर दादा गव्हाणे व त्याच्या अल्पवयीन मित्राने दोन महिन्यांपूर्वीच माउली गव्हाणेच्या हत्येचा कट रचला होता. ६ मार्चच्या रात्री माउलीला लुडो गेम खेळण्याचा बहाणा करून बोलवून घेतले. दाणेवाडी येथील विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीवर नेऊन गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर दोन विहिरीत त्याच्या मृतदेहाचे वेगवेगळे अवयव टाकले.

तो मृतदेह माऊलीचा

दाणेवाडी येथील माऊली सतीश गव्हाणे हा घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार शिरूर पोलिस ठाण्यात दाखल होती. तो कुठे गेला, याची माहिती घरच्यांनाही मिळत नव्हती.याचदरम्यान १२ मार्च रोजी दाणेवाडी शिवारातील घोडनदीच्या काठी असलेल्या एका विहिरीत शीर व एक हात आणि पाय नसलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. विहिरीत सापडलेला मृतदेह हा माऊली गव्हाणे याचाच आहे का? याचा पोलिसांनी शोध घेतला.नातेवाईकांकडेही चौकशी केली. पण कुणाचाच विश्वास बसत नव्हता.त्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. आजूबाजूच्या विहिरींत शोध घेतला असता, शीर सापडले. त्यावरून विहिरीत सापडलेला मृतदेह बेपत्ता माऊली गव्हाणे याचाच असल्याची पोलिसांची खात्री झाली.

Web Title: ahilyanagar shrigonda A murder plot was hatched a month and a half ago invited to play Ludo game and coolly foiled it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.