वस्ताद काकांनी कान उपटल्यानंतर कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला - हर्षवर्धन सदगीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:47 IST2026-03-24T11:46:54+5:302026-03-24T11:47:14+5:30
एकदा महाराष्ट्र केसरी होताच, यावेळी माझ्या मनातील भावनेचा बांध फुटला. त्या भावनेच्या भरातच मी ‘यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाही,’ अशी घोषणा केली

वस्ताद काकांनी कान उपटल्यानंतर कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला - हर्षवर्धन सदगीर
पुणे: दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावत हर्षवर्धन सदगीरने यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाही आणि मला सरकारी नोकरीची देखील गरज नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती पण वस्ताद काका पवार यांनी कान उपटल्यानंतर हर्षवर्धनला चुकीची उपरती झाली आणि त्याने कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला तसेच, सरकारी नोकरीची अपेक्षाही कायम असल्याचे सांगत हर्षवर्धनने चर्चांना पूर्णविराम दिला.
‘डबल महाराष्ट्र केसरी’ झाल्यानंतर हर्षवर्धन सदगीरचा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दुसऱ्याच दिवशी सोमवारी विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात हर्षवर्धन व त्याचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधला.
हर्षवर्धन सदगीर म्हणाला, २०१९ साली मी पहिल्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ झालो. मग पुढील दोन वर्षे कोरोनात गेली. त्यानंतर माझी कामगिरी कमालीची ढेपाळली. अनेक स्पर्धांत अपयशी ठरल्याने मी टीकेचा धनी ठरलो होतो. हर्षवर्धन आता संपला, आता तो कुठलाच किताब जिंकू शकत नाही, अशी माझ्यावर दबक्या आवाजात टीका व्हायला लागली. या चर्चा सातत्याने कानावर पडत असल्याने मी थोडा नैराश्यात गेलो होतो. मात्र, गुरुवर्य काका पवार यांनी मला यातून सावरले. पुन्हा जिद्दीने सरावाला लागलो अन् ‘महाराष्ट्र केसरी’चे ६८ वे अधिवेशन गाजवून मी पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा उंचावून दाखविली. मात्र, महाराष्ट्र केसरी होताच, यावेळी माझ्या मनातील भावनेचा बांध फुटला. त्या भावनेच्या भरातच मी ‘यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाही,’ अशी घोषणा केली. याआधी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, नोकरी न मिळाल्याने मी हताश झालो होतो. ती खदखदही यावेळी बाहेर आल्याने ‘मला आता सरकारी नोकरीची गरज नाही,’ असे चुकीचे वक्तव्य मी केले. या चुकीच्या बोलण्यावर काका पवार माझ्यावर चिडले. त्यांनी मला चुकीच्या बोलण्याची जाणीव करून दिली.