दिल्ली भीषण स्फोटानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर; पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसची छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:42 IST2025-11-12T15:41:45+5:302025-11-12T15:42:04+5:30
दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे

दिल्ली भीषण स्फोटानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर; पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसची छापेमारी
पुणे : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी देशभरात मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहिम सुरू केली आहे. दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात सुरक्षा दलांनी आक्रमक मोहीम सुरू केली आहे. 1,500 हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात छापेमारी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही यंत्रणा सतर्क झाली असून पुणे, मुंबईत एटीएसने धाड टाकली आहे.
मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाचं धाडसत्र सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. यात शिक्षक असलेल्या इब्राहिम आबिदी यांच्या मुंब्रा आणि कुर्ला येथील घरावर एटीएसने धाड टाकली. यावेळी घरातून मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईत इब्राहीम अबिदी नावाच्या एका शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. एटीएसला संशय आहे की, 'हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता'. अबिदीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून, त्याचा तपास केला जाणार आहे. तर एटीएसने पुण्यात सुद्धा छापेमारी केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून छापेमारी करण्यात आली आहे. अद्याप त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेले नसलं तरी त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे.