Pune Flood: पुराचा फटका बसल्यानंतर आली महापालिकेला जाग; नदीपात्रातून काढला २०४ डंपर राडारोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 13:18 IST2024-07-30T13:15:33+5:302024-07-30T13:18:00+5:30
नदीपात्रात राडारोडा टाकून पात्र अरुंद केल्याने पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आणि त्याचा फटका सिंहगड रस्ता परिसराला बसला

Pune Flood: पुराचा फटका बसल्यानंतर आली महापालिकेला जाग; नदीपात्रातून काढला २०४ डंपर राडारोडा
पुणे : खडकवासला धरणातून ३५ हजार ५५६ क्युसेकने पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्तावरील एकतानगरसह पुलाची वाडी भागात पाणी शिरले. दरम्यान, नदीपात्रात राडारोडा टाकून पात्र अरुंद केल्याने पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आणि त्याचा फटका सिंहगड रस्ता परिसराला बसला. त्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढण्यास सुरुवात केली आहे. साेमवारी दिवसभरात सुमारे २०४ ट्रक राडारोडा काढला आहे. तसेच महापालिकेने जागा मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.
खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर या राडारोड्यामुळे एकतानगर भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या नाल्याचे पाणीही वस्तीमध्ये घुसले होते. त्यामुळे एकतानगर व परिसरातील अन्य कॉलनीमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी साेमवारपासून राडारोडा काढण्याचे काम सुरू केले आहे. यात १२ जेसीबी, २५ डंपर यांच्या सहाय्याने दिवसभरात २०४ डंपर राडारोडा काढला आहे. त्यासाठी ३७ ड्रायव्हर, २ कार्यकारी अभियंता, २ उपअभियंता, ६ कनिष्ठ अभियंता याचा समावेश होता.
भराव टाकून अनेक एकर जमीन केली तयार
राजाराम पूल ते शिवणेदरम्यान मुठा नदीपात्रात खासगी जागा मालकांनी हजारो ट्रक राडारोडा टाकून पात्र बुजविले हाेते. त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा हेतू होता. यामध्ये प्रामुख्याने राजाराम पूल ते वारजे पूलदरम्यान जास्त राडारोडा टाकण्यात आला आहे, त्यातून अनेक एकर जमीन निर्माण केली आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाने सोयीस्कर डोळेझाक केल्याचा आरोप केला जात आहे.
खाणीत राडारोडा टाकणार
कर्वेनगर, शिवणे, कोंढवे-धावडे आदी भागांत नदीच्या कडेने राडारोडा टाकला आहे. तो राडारोडा नदीपात्रातून काढून जवळच असलेल्या खासगी जागेत टाकला जात आहे. महापालिकेचा वाघोली येथे सी ऑड ही प्रकल्प आहे. येथे राडारोडा नेऊन टाकणे आवश्यक आहे. त्याबाबत उपायुक्त माधव जगताप यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘सध्या नदीपात्रातील राडारोडा काढण्याचे काम सुरू असून, सध्या प्राधान्याने राडारोडा काढून जवळच टाकला जात आहे. त्यानंतर तो वाघोलीतील खाणीत नेऊन टाकला जाईल.
ठिकाण राडारोडा उचलेल्या डंपरची संख्या
कर्वे स्मशानभूमी - १०
महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर - १५८
दांगट पाटील इस्टेट शिवणे - १२
राजाराम पूल परिसर - २२
दुधाने लॉन्स कर्वेनगर - २
एकूण २०४
नदीच्या कडेने खासगी मालकांनी टाकलेला राडारोडा महापालिका काढत आहे. हा भराव काढण्याचा खर्च जागा मालकाकडून वसूल केला जाणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. - राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका