पुण्यात अडकलेले अफगाणी नागरिक परतले मायदेशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 17:55 IST2020-05-17T17:54:54+5:302020-05-17T17:55:25+5:30
पुण्यात अडकलेल्या 143 अफगाणी नागरिकांना पुणे विमानतळावरुन विशेष विमानाने काबुलला पाठविण्यात आले.

पुण्यात अडकलेले अफगाणी नागरिक परतले मायदेशी
पुणे : लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकले १४३ अफगाणी नागरिक पुणे विमानतळावरून विशेष विमानाने काबुलकडे रवाना झाले. त्यापुर्वी या विमानाने अफगाणिस्तानमध्ये अडकलेले नऊ जण पुण्यात दाखल झाले. त्यापैकी एका नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
अफगाणिस्तान सरकारने त्यांच्या नागिरकांना परत नेण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. काम एअरलाईन्सचे विशेष विमान नऊ भारतीयांना घेऊन दुपारी १२.४० वाजता पुणे विमानतळावर उतरले. तर दीड वाजण्याच्या सुमारास अफगाणी नागरिकांना घेऊन उड्डाण केले. या नागरिकांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मधील विद्यार्थी, मिलिटरी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी तसेच पुण्यासह गोवा, बेंगलुरू मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एकुण १४७ प्रवासी अफगाणीस्तानला जाण्यासाठी विमानतळावर आले होते. मात्र विमानाची क्षमता १४३ प्रवाशांचीच असल्याने चार जणांना परत पाठविण्यात आले. एकाही प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. सीमाशुल्क, विमानतळ प्राधिकरण, इमिग्रेशन, सीआयएसएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून नियोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांना विमानतळापर्यंत नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षित अंतर, मास्क, पीपीई कीट तसेच इतर सुरक्षा साधनांचा वापर करून प्रवाशांची तपासणी करून पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.