राज्यात एफडीएच्या कारवाईत सुमारे २ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:59 IST2025-10-18T16:58:19+5:302025-10-18T16:59:02+5:30
विशेष मोहिमेदरम्यान ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे

राज्यात एफडीएच्या कारवाईत सुमारे २ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त
पुणे : राज्यात सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध अन्न मिळावे, तसेच बाजारात विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) विशेष तपासणी मोहीम राबवली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा या अभियानांतर्गत राज्यभरात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. तपासणीवेळी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या खवा, स्वीट मावा, गाईचे तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप, भगर अशा अन्नपदार्थांचे ६५४ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी २१६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, १९० नमुने प्रमाणित दर्जाचे, ५ कमी दर्जाचे, ८ मिथ्याछाप आणि १३ असुरक्षित नमुने आढळले आहेत. दोषी नमुन्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. अन्नातील भेसळ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे अन्नपदार्थांची खरेदी करताना उत्पादकाचे नाव, उत्पादन दिनांक, ‘एफएसएसएआय’ परवाना क्रमांक आणि शुद्धतेची खात्री करणे गरजेचे आहे. या मोहिमेमुळे राज्यात अन्न सुरक्षिततेबाबत जनजागृती वाढली असून, ग्राहकांनी शुद्धतेबाबत जागरूक राहणे हेच ‘सण सुरक्षिततेचा’ खरा संकल्प असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
सणासुदीच्या काळात अन्नातील भेसळीबाबत नागरिकांना शंका आल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा किंवा नजीकच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयात तक्रार नोंदवावी. - सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.