10th-12th Supplementary Exam: दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 20:48 IST2023-07-03T20:48:11+5:302023-07-03T20:48:18+5:30
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून येत्या ५ जुलैपासून सकाळी अकरा वाजल्यानंतर प्रवेशपत्र शाळा, महाविद्यालयात डाउनलाेड करून घेता येणार

10th-12th Supplementary Exam: दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन मिळणार
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या जुलै, ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन माध्यमातून मिळणार आहेत. परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशपत्र दिले जाणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून येत्या ५ जुलैपासून सकाळी अकरा वाजल्यानंतर प्रवेशपत्र शाळा, महाविद्यालयात डाउनलाेड करून घेता येणार आहेत.
शाळा, महाविद्यालयांनी मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची प्रिंट काढून द्यायची आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिंट काढून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असल्याशिवाय ते ग्राह्य धरले जाणार नाही असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्याही विभागीय मंडळस्तरावरून होणार आहेत. त्यासाठी शाळांनाच विभागीय मंडळाशी संपर्क साधावा लागणार आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे, असेही मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.