Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीच्या जादा बसेस धावणार; महादेवाच्या दर्शनासाठी 'या' स्थानकांवरून बसेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:58 IST2025-02-24T16:58:08+5:302025-02-24T16:58:25+5:30
नीळकंठेश्वर, बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीच्या जादा बसेस धावणार; महादेवाच्या दर्शनासाठी 'या' स्थानकांवरून बसेस
पुणे: महाशिवरात्रीनिमित्त नीळकंठेश्वर, बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी बुधवार (दि. २६) रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कात्रज सर्पोद्यान, स्वारगेट मुख्य स्थानक आणि निगडी (पवळे चौक) या महत्त्वाच्या बसस्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
शहर व उपनगरातून हजारो भाविक दर्शनासाठी नीळकंठेश्वर, बनेश्वर, घोरावाडेश्वर मंदिर या ठिकाणी जातात. त्यामुळे भाविकांची गर्दी होते. त्यामुळे कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटापर्यंत), स्वारगेट मुख्य स्थानक स्वारगेट ते नीळकंठेश्वर (बीएसएफ सेंटर, पानशेत) निगडी (पवळे चौक) ते घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणावरून पीएमपीच्या जादा बसेस धावणार आहेत. भाविकांनी पीएमपीकडून करण्यात आलेल्या नियमित व जादा बससेवेची नोंद घेऊन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बनेश्वरला येथून जा
कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ५:३० वा. असून, नियमित सुरू असणारे कात्रज ते सारोळामार्गे कापूरहोळ, कात्रज सर्पोद्यान ते वेल्हे व कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी या मार्गांवर ९ बसेस व यात्रेसाठी २ जादा बसेस अशा एकूण ११ बसेस सरासरी २० मिनिटांच्या वारंवारीतेने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्वारगेटवरून नीळकंठेश्वला जा
स्वारगेट मुख्य स्थानकावरून नीळकंठेश्वर (बीएसएफ सेंटर, पानशेत) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ३:३० वा. असून, नियमित सुरू असणारा बसमार्ग स्वारगेट ते पानशेत / वरसगाव या मार्गावर २ बसेस व यात्रेसाठी १२ जादा बसेस, अशा एकूण १४ बसेस धावणार आहेत.
घोरावाडेश्वर मंदिर पायथा
निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ५:२० मि. असून, सदर ठिकाणी जाण्याकरिता नियमित सुरू असणारे बसमार्ग कात्रज ते वडगाव मावळ, निगडी पवळे चौक ते वडगाव मावळ, निगडी ते उर्सेगावमार्गे तळेगाव, निगडी ते उर्सेगावमार्गे परंदवाडी, निगडी ते लोणावळा या सहा मार्गांवर एकूण २४ बसेस धावणार आहेत.