संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 18:32 IST2025-03-14T18:31:37+5:302025-03-14T18:32:32+5:30
भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयी व्हावी, यासाठी ‘पीएमपी’कडून २९१ जादा बस सोडण्यात आल्या आहेत

संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार
पुणे : श्री संत तुकाराम बीज सोहळा रविवारी (दि. १६) होणार आहे. यात्रा काळात देहूगाव येथे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे ‘पीएमपी’कडून (दि. १५) ते (दि. १७) या कालावधीत जादा बस सोडण्यात आल्या आहेत. यामुळे दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना देहूगावाला जाण्यास सोयीचे होणार आहे.
तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त पुणे व पिंपरी चिंचवड, उपनगर तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूगाव येथे दाखल होतात. यामुळे भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयी व्हावी, यासाठी ‘पीएमपी’कडून २९१ जादा बस सोडण्यात आल्या आहेत. शिवाय यंदादेखील पीएमपीकडून जादा बसेसची व्यवस्था नेहमीच्या तिकीट दराने करण्यात आलेली आहे. तसेच देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील झेंडे मळ्याजवळील सैनिकी मैदानावरून बसेसची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेली आहे. देहूगावहून आळंदी येथे ये-जा करण्याकरिता गाथा मंदिराजवळ असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येणार आहे. या बससेवेचा भाविक, प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी महामंडळाकडून करण्यात येत आहे.
येथून धावणार जादा बस
देहूगाव येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वारगेट ते देहूगाव, मनपा भवन ते देहूगाव, निगडी ते देहूगाव, पुणे स्टेशन ते देहूगाव, देहूरोड स्टेशन ते देहूगाव, आळंदी ते देहूगाव या मार्गांवरून बस धावणार आहेत.