"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:28 IST2025-11-19T15:06:55+5:302025-11-19T15:28:02+5:30
रमेश परदेशी यांनी मनसे सोडून भाजपसोबत जाण्याचे कारण सांगितले आहे.

"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
Ramesh Pardeshi Join BJP: 'मुळशी पॅटर्न' चित्रपटामुळे पिट्या भाई म्हणून घराघरात पोहोचलेले अभिनेते रमेश परदेशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी यांनी मंगळवारी रात्री भाजपचे कमळ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. रमेश परदेशी हे गेले काही दिवस राजकीय घडामोडींमुळे चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या बैठकीत पक्षबांधणीच्या कामातील दिरंगाईवर राज ठाकरे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी परदेशी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील पथसंचलनाच्या फोटोवरुन राज ठाकरे यांनी टिप्पणी केली होती. त्यानंतर अचानक रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
याच बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी पिट्या भाई फेम रमेश परदेशी यांना थेट फटकारल्याची चर्चा होते. राज ठाकरेंनी परदेशी यांना स्पष्टपणे "तू छातीठोकपणे सांगतोस की, संघाचा कार्यकर्ता आहेस, तर मग इथे कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी निश्चित भूमिका घे," असं म्हटल्याचे माध्यमांनी म्हटलं होतं.
एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विचारधारेसोबत न राहण्याचा स्पष्ट आणि थेट सल्ला राज ठाकरे यांनी दिला होता. या घटनेनंतर काही दिवस रमेश परदेशी शांत होते.
मनसेमधून भाजपामध्ये प्रवेश
राज ठाकरेंच्या या सल्ल्यानंतर रमेश परदेशी काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी रात्री त्यांनी मनसेची साथ सोडण्याचा निर्णय घेत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता रमेश परदेशी यांनी लोकमतसोबत बोलताना मनसे सोडण्याचे कारण सांगितले.
"त्या दिवशी शाखाध्यक्षांची अतिशय गोपनिय बैठक होती. तिथे राज ठाकरे आल्यानंतर त्यांनी तुझं संघ वगैरे काय आहे असं विचारलं. त्यावर मी साहेब आहे, मी इथे १८ वर्षे जसं काम करतोय तसंच लहानपणापासून संघही आहे, असं म्हटलं. त्यावर त्यांनी मिश्किल पद्धतीने बंद करा रे असं म्हटलं. मलाही हाच प्रश्न पडला आहे की त्यांना आताच संघात असण्यावर आक्षेप का आला. कारण गेली २० वर्षे मी तुमच्याशी संबंधित आहे. आधीपासून माझ्या फेसबुकवर संघाच्या संचालनाचे फोटो दिसतील. इतके वर्षे फोटो असताना आताच का तो विषय निघाला हे कळत नाहीये. मला सुद्धा याची कल्पना नव्हती. राज ठाकरे बोलले त्याचे वाईट वाटले नाही कारण त्यांची ती पद्धत आहे आणि त्यांना तो अधिकार आहे," असे रमेश परदेशी म्हणाले.
"हे कुणी आणि का केलं हा प्रश्न मला पडला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असती तर मी समजू शकतो. पण तसलं काही नाही. पक्षाला माझ्याकडून जी मदत शक्य होती ती मी करत होतो. मला शिव्या दिल्या तरी फरक पडणार नाही. पण जो विचार तुमच्या बरोबर आहे, जे संस्कार तुम्ही घेऊन चालला आहात ते संघाचे आहेत. मग त्याच्यावर आल्यानंतर थोडा मी व्यवहार्य होणार ना. कारण मी एकटा स्वयंसेवक नाही. माझ्या कुटुंबातील लोकही संघाचे सदस्य आहेत. असं असतानाही मी मनसेसोबत काम करत होतो. माझ्या विचारांचा विषय होता म्हणून निर्णय घेतला," असंही रमेश परदेशी यांनी म्हटलं.