Pune Police: अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर
By नम्रता फडणीस | Updated: March 18, 2025 17:03 IST2025-03-18T17:03:01+5:302025-03-18T17:03:37+5:30
रात्रीपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे

Pune Police: अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर
पुणे: नागपूर हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, शहर, परिसरात सतर्कतेचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. तसेच समाजमाध्यमात अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटांत वाद झाला झाला. वादातून दगडफेक, तसेच वाहने जाळण्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी ७० जणांना पकडले असून, नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.
रात्रीपासून शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अनुचित घटना प्रकार घडल्यास त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाशी (क्रमांक ११२) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.