Diwali Festival: सणांच्या काळात तिकीट दर वाढणाऱ्या बसवर कारवाई; 'या' ठिकाणी करा तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:12 IST2025-10-10T13:11:02+5:302025-10-10T13:12:50+5:30
एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट तिकीट घेण्यास परवानगी आहे. पण, त्यापेक्षा जादा तिकीट घेतल्याचे आढळून आल्यास अशा बसचालकांवर कारवाई केली जाईल

Diwali Festival: सणांच्या काळात तिकीट दर वाढणाऱ्या बसवर कारवाई; 'या' ठिकाणी करा तक्रार
पुणे: दिवाळी सणाच्या काळात खासगी बसचालकांनी मनमानी पद्धतीने तिकीट दर आकारू नये. एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट तिकीट घेण्यास परवानगी आहे. पण, त्यापेक्षा जादा तिकीट घेतल्याचे आढळून आल्यास अशा बसचालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी खासगी बसचालकांना गुरुवारी बैठकीत दिला.
दिवाळीच्या काळात खासगी बसचालकांनी मोठ्या प्रमाणात तिकिटामध्ये वाढ केल्याचे दिसून येत आहे. याबाबत आरटीओकडे तक्रारीदेखील येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुरुवारी खासगी बसचालकांनी बैठक पार पडली. या बैठकीला गायकवाड यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, पिंपरी चिंचवडचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड, युवराज पाटील व बस ओनर्स असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. गायकवाड यांनी खासगी बसचालकांच्या प्रतिनिधींना दिवाळीच्या काळात नियमापेक्षा जास्त तिकीट आकारू नका, अशा सूचना केल्या. तसेच, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नका, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन धोकादायक पद्धतीने उभे करू नका, वाहनाची सर्व वैध कागदपत्रे जवळ बाळगा, अशा सूचना केल्या. यावेळी खासगी बसचालकांनी त्यांचे प्रश्न मांडले.
या ठिकाणी करा तक्रार
जादा भाडे आकारल्यास नागरिकांनी ८२७५३३०१०१ या क्रमांकावर अथवा rto.12-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार करावी. नागरिकांनी तक्रार करताना आपले नाव, मोबाईल क्रमांक, तिकिटाचे फोटो अशी माहिती पाठवावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.