HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:10 IST2023-03-09T11:07:51+5:302023-03-09T11:10:28+5:30
यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आल्याने कॉपी करताना आढळ्यास कारवाई केली जात आहे

HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई
पुणे : राज्यात बुधवार, दि. ८ राेजी बारावीचा बायाेलाॅजी पेपरला काॅपी केल्याप्रकरणी २९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पुणे विभागीय मंडळात सर्वाधिक १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच दहावीच्या हिंदी विषयाच्या पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या ८ जणांना पकडण्यात आले असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली.
बारावी परीक्षेदरम्यान विज्ञान शाखेच्या विषयांत विद्यार्थ्यांकडून काॅपी करण्याच्या प्रकारांत वाढ हाेत असल्याचे यापूर्वी झालेल्या पेपरमध्ये दिसून आले आहे. बुधवारीही बायाेलाॅजीच्या परीक्षेदरम्यान २९ विद्यार्थी काॅपी करताना आढळून आले. यापूर्वी फिजिक्स पेपरला ५० तर केमिस्ट्रीच्या पेपरला ४६ विद्यार्थ्यांना काॅपी करताना पकडण्यात आले हाेते.
दरम्यान राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देत असून ही आत्तापर्यंत ची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर भरारी पथक आणि बैठी पथक आहेत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटी १० मिनिट वाढवून देण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर ५० मीटर अंतरावर कुठल्याही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणाला ही फिरायला परवानगी नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रापासून ५० मीटर अंतरावर झेरॉक्स चे दुकान बंद ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडी नेताना जी पी एस लावण्यात आले आहेत.