Action By Anti Corruption Bureau: एक लाखांची लाच घेताना वनपाल, वनरक्षक जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 20:34 IST2021-11-18T20:33:25+5:302021-11-18T20:34:37+5:30
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिरुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात सापळा रचून कारवाई केली

Action By Anti Corruption Bureau: एक लाखांची लाच घेताना वनपाल, वनरक्षक जाळ्यात
पुणे: सरपण घेऊन जाणाऱ्या पीकअप वाहनावर कारवाई न करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून वनक्षेत्रपाल व वनरक्षकाला रंगेहाथ पकडले. वनपाल सागर नवनाथ भोसले (वय ३४) आणि वनरक्षक संजय जयसिंग पाव्हणे (वय ४५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शिरुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे पीकअप गाडीमधून सरपण घेऊन जात असताना वनरक्षक व वनपाल यांनी ही गाडी पकडली. त्यांनी गाडी ताब्यात घेतली. या गाडीमध्ये सरपण वाहतूकीचा परवाना नसल्याचे सांगून गाडीवर वन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. दंड भरावा लागेल, असे तक्रारदारांना सांगण्यात आले. गाडीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी तक्रारदारांकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी लाच लुचपत प्तिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी १० नोव्हेंबर रोजी करण्यात आली. त्यात दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदारांना पैसे देण्यासाठी आज बोलावण्यात आले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिरुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले. शिरुर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडनौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर तपास करीत आहेत.