पुण्यात धुळवडीला १ हजार ३०१ जणांवर कारवाई, १४२ वाहनचालकांचे मद्यप्राशन

By विवेक भुसे | Published: March 26, 2024 08:26 PM2024-03-26T20:26:17+5:302024-03-26T20:26:35+5:30

बेशिस्तपणे वाहन लावणे, मोठ्याने हाॅर्न वाजविणे, सिग्नल तोडणाऱ्या ९३३ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई

Action against 1 thousand 301 people in Dhulwadi in Pune, 142 drivers drinking alcohol | पुण्यात धुळवडीला १ हजार ३०१ जणांवर कारवाई, १४२ वाहनचालकांचे मद्यप्राशन

पुण्यात धुळवडीला १ हजार ३०१ जणांवर कारवाई, १४२ वाहनचालकांचे मद्यप्राशन

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलाने धुळवडीनिमित्त शहरात कडक बंदोबस्त लावला होता. या दरम्यान, मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, ट्रिपल सीट, बेशिस्त वर्तन करणारे, वाहतूकीचे नियम मोडणार्या १ हजार ३०१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

धुळवडीला भरधाव वाहने चालविल्याने गंभीर स्वरुपाचे अपघात होतात. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवर सोमवारी (२५ मार्च) २७ ठिकाणी विशेष नाकाबंदी लावण्यात आली होती.

नाकाबंदीत ब्रीथ ॲनलायजर यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १४२ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्यात आले, तसेच एकाच दुचाकीचा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी (ट्रिपल सीट) वापर केल्याप्रकरणी २२६ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली, बेशिस्तपणे वाहन लावणे, मोठ्याने हाॅर्न वाजविणे, सिग्नल तोडणाऱ्या ९३३ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

Web Title: Action against 1 thousand 301 people in Dhulwadi in Pune, 142 drivers drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.