कोसळत्या पावसात तब्बल बावीस तासात साधले लक्ष्य; साडेनऊशे कामगारांनी केला पुणे - मुुंबई रेल्वे मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 01:09 PM2021-07-25T13:09:31+5:302021-07-25T13:21:19+5:30

देशातल्या सर्वात अवघड चढणीवर ‘बोल्डर स्पेशल ट्रेन’ची जादू; रात्री जिवाची पर्वा न करता कामगार त्या घाटात अखंड झगडत होते

Achieved in twenty-two hours in torrential rains; Nine hundred and fifty workers cleared the Pune-Mumbai railway line | कोसळत्या पावसात तब्बल बावीस तासात साधले लक्ष्य; साडेनऊशे कामगारांनी केला पुणे - मुुंबई रेल्वे मार्ग मोकळा

कोसळत्या पावसात तब्बल बावीस तासात साधले लक्ष्य; साडेनऊशे कामगारांनी केला पुणे - मुुंबई रेल्वे मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देलोणावळा - कर्जत सेक्शनमध्ये १६० मिलिमीटर पाऊस कोसळलासुमारे १७ ठिकाणी दरडी कोसळल्या

प्रसाद कानडे

पुणे : स्थळ-सह्याद्री डोंगरमाथ्यावरच्या लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावरील अडचणीचे. वेळ - काळरात्र. डोळ्यात बोट घातले तरी कळू नये इतक्या गर्द काळोखाची रात्र अन् सोबतीला धो - धो पाऊस, घाटमाथ्यावरचा बेभान वारा, आसपासच्या डोंगरांवरून दगड-धोंडे घेऊन भीतिदायक आवाज करत कोसळणाऱ्या जलधारा!... हे एखाद्या भयपटाच्या चित्रीकरणासाठीचा हा सेटअप नव्हे. पण त्या भयाण रात्री जिवाची पर्वा न करता एक ना दोन तब्बल साडेनऊशे कामगार त्या घाटात अखंड झगडत होते. कोसळत्या पावसात तब्बल बावीस तास. लक्ष्य एकच होते, दरडी कोसळल्याने, रुळ वाहून गेल्याने बंद झालेला पुणे-मुंबईरेल्वे मार्ग पूर्ववत चालू करणे.

साडेनऊशे बहाद्दरांनी हे काम वेळेत पूर्णही केले. पुण्याहून मुंबईकडे निघाल्यानंतर चढावा लागणाऱ्या बोर घाटातील रेल्वे मार्ग हा केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वाधिक चढणीचा (ग्रेडियंट) म्हणून ओळखला जातो, तो या अवघड बोरघाटात आहे. कोसळत्या पावसात आणि भयाण अंधारात कामगारांनी रेल्वे मार्गावर पडलेल्या दरडी दूर केल्या. कोणी दोरीला लटकत पडू शकणाऱ्या धोकादायक दरडी दूर केल्या. यात सिंहाचा वाटा होता तो ‘हिलगँग’चा. डोंगरांवर चढून धोकादायक दरडींचे काम तमाम करण्याचे खास प्रशिक्षण या ‘हिलगँग’मधल्या कामगारांना दिलेले असते.

बुधवारी मध्यरात्री लोणावळा - कर्जत सेक्शनमध्ये १६० मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे सुमारे १७ ठिकाणी दरडी कोसळल्या. काही ठिकाणी रुळांचे तुकडे झाले. काही ठिकाणी रुळांवर मोठ्या प्रमाणात माती, दगडधोंडे वाहून आले. पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याची वर्दी दिल्यानंतर मुंबईचे रेल्वे नियंत्रण कक्ष सतर्क झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून लागलीच त्यांनी पुणे नियंत्रण कक्षाला आदेश देऊन पुण्यातून रेल्वेगाडी न सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर तो रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याची धडपड सुरू झाली. 

‘सीसीटीव्ही’चा घेतला आधार

सर्वात प्रथम कोणत्या ठिकाणी दरड कोसळली हे पाहण्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी भर दिला. दरडींचा राडारोडा किती हे पाहण्यासाठी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली गेली. यामुळे दरड कोसळलेल्या नेमक्या जागी जाण्यास मदत झाली. त्यानुसार दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. बोरघाटातील २८ किलोमीटर रेल्वे मार्गावर ५८ लहान-मोठे बोगदे आहेत. बोगद्यांच्या दोन्ही बाजूला मिळून ११५ सीसीटीव्ही कॅमेरे या मार्गावर बसवण्यात आले आहेत.

...अन् पोकलेन घेऊन ‘बोल्डर स्पेशल’ रवाना

पुणे-मुंबई रेल्वे रस्त्यावर अप, डाऊन आणि मिडल अशा तीन रूळ मार्ग आहेत. अतिवृष्टीत दरडी कोसळल्याने हे तिन्ही मार्ग बंद झाले होते. या दुरुस्तीसाठी एकीकडे प्रचंड मनुष्यबळ लागणार होते. दुसरीकडे जलद कामासाठी यंत्रसामुग्री हवी होती. ‘हिलगँग’मधले अनुभवी कामगार, नेहमी रुळांवर गस्त घालणारे पेट्रोलिंग कामगार तसेच दरड कोसळण्याची माहिती देणाऱ्या ‘स्टॅटिक वॉचमन’ या सर्वांना घेऊन साडेनऊशे जणांची टीम तयार करण्यात आली. डोंगरातल्या अवघड कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या लोणावळा डीबीकेएम या विशेष प्रकारच्या वॅगनमधून पोकलेन आणण्यात आले. या सर्वांना घेऊन खास रेल्वे रुळांचा अंदाज घेत बोरघाटात रवाना करण्यात आली. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सर्व सामग्री, खडी, माती, स्लीपर्स, अन्य यंत्रसामग्री तसेच कामगार व त्यांचे जेवणखाण घेऊन जाणाऱ्या रेल्वेला ‘बोल्डर स्पेशल’ म्हणतात.

मात्र घाटात जायला रस्ता नाही, ना रेल्वे मार्ग 

रूळ वाहून गेल्याने किंवा दरडी कोसळल्याने घाटात जाणारे तिन्ही रेल्वे मार्ग बंद झाले होते. मग मदत कार्य करायचे कसे हा प्रश्न होता. पोकलेन घेऊन निघालेल्या ‘बोल्डर स्पेशल’मधील कामगारांनी उत्तर शोधले. रेल्वे मार्गावरील एकेक अडथळे दूर करत ते पुढे सरकत राहिले. जिथे शक्य आहे तिथे मानवी बळाने. शक्य असेल तिथे रेल्वेतली पोकलेन खाली उतरवून. आणि पोकलेन घेऊन येणारे रेल्वेच्या मार्गात एक एक अडथळे दूर केले गेले. कामगार खाली उतरत तो मार्ग दुरुस्त करीत पुढे जात राहिले.

Web Title: Achieved in twenty-two hours in torrential rains; Nine hundred and fifty workers cleared the Pune-Mumbai railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app