प्रांजल खेवलकरसोबत असलेले रेकॉर्डवरील आरोपी; दोघांवर गंभीर गुन्हे असल्याची धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:41 IST2025-07-28T13:40:15+5:302025-07-28T13:41:22+5:30
प्रांजल खेवलकर त्याच्यासोबत असणाऱ्या मंडळींकडून दर शनिवारी-रविवारी बुकिंग केले जात असल्याची माहितीदेखील पोलिस तपासात समोर आली आहे

प्रांजल खेवलकरसोबत असलेले रेकॉर्डवरील आरोपी; दोघांवर गंभीर गुन्हे असल्याची धक्कादायक माहिती समोर
पुणे: प्रांजल खेवलकर याच्यासोबत असलेले त्याचे निखिल जेठानंद पोपटाणी आणि श्रीपाद मोहन यादव हे दोघे रेकॉर्डवरील आरोपी आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी पोलिसांनी रेड मारली, त्याठिकाणी दर शनिवारी-रविवारी या मंडळींकडून बुकिंग केले जात असल्याची माहितीदेखील पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारच्या पार्टीचे किती वेळा आयोजन केले, तसेच एकमेकांच्या नियमित संपर्कात होते का? यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हाय प्रोफाईल पार्टीची टीप...
गुन्हे शाखेला खराडी परिसरातील या हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल पार्ट्या सुरू असतात अशी टीप मिळाली होती. गेल्या २ दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते. शनिवारी रात्री आरोपींनी शहरातील एका पबमध्ये नियमित पद्धतीने पार्टी केली. सर्व आरोपींची एकमेकांशी ओळख पब, पार्ट्यांमध्ये वारंवार जात असल्याने झाली होती. मध्यरात्री दीड वाजता पब बंद झाल्यावर प्रांजल खेवलकर त्याच्यासोबतचे सहकारी खराडीतील हॉटेलवर गेले. तेथे पुन्हा त्यांनी पार्टी सुरू केली. यावेळी मोठ्या प्रमाणात हुक्का फ्लेवरचे बॉक्स, हुक्का पॉट, गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ आणि मद्यपान सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे सूत्र हाती घेतले. पोलिसांनी हॉटेलवर रेड मारली असता, काही मुलींनी त्या परिसरातून पळ काढला. पोलिसांनी सध्या त्या तीन जणींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनालाही चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या घराची झडती...
गुन्हे शाखेने आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या हडपसर येथील घराची सुमारे तासभर झडती घेतली. घरातून पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राइव्ह व अन्य साहित्य जप्त केले आहे. यामधून आणखी काहीतरी माहिती समोर येईल अशी पोलिसांना अपेक्षा आहे. याशिवाय आरोपींचे ब्लड सॅम्पलदेखील घेण्यात आले असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबला त्याचे सॅम्पल पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.