पपई चोरल्याचा आरोप; ७ वर्षीय मुलीच्या तोंडावर बुक्क्या, गळा आवळण्याचा प्रयत्न, उरुळी कांचनमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:04 IST2024-12-19T20:02:42+5:302024-12-19T20:04:10+5:30
मुलीच्या तोंडावर बुक्या मारून रुमालाने गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि मुलीला गटाराच्या खड्यात फेकून दिले

पपई चोरल्याचा आरोप; ७ वर्षीय मुलीच्या तोंडावर बुक्क्या, गळा आवळण्याचा प्रयत्न, उरुळी कांचनमधील घटना
उरुळी कांचन: पपई चोरी केल्याचा आरोप करत एका दारुड्या माणसाने सात वर्षीय मुलीला तोंडावर बुक्क्या मारून गळ्याला रुमाल आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना उरुळीकांचन पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव येथे मंगळवारी दि.17सायंकाळी साडे चार वाजता घडली. याबाबत नेहरू जंगल सिंह ठाकरे (वय ३४ रा. नायगाव बाळूमामा मंदिराजवळ, ता. हवेली, मूळ राहणार लाखापूर, ता. तळोदा, जिल्हा नंदुरबार) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुखदेव जगन्नाथ शिंदे (रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि 17) सायंकाळी साडे चार वाजता सात वर्षीय मुलगी ही मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी आरोपी सुखदेव शिंदे हा तिथे आला. त्याने मद्यप्राशन केले होते. पपई चोरी केल्याचा आरोप करत आरोपीने खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीला हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर तोंडावर बुक्क्या मारून रुमालाने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मुलीला गटाराच्या खड्यात फेकून दिल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असुन घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पो.ह. सुजाता भुजबळ, पो. कॉ. दिपक यादव, अमोल खांडेकर, राजकुमार भिसे यांनी घटनास्थळी जाऊन पुढील तपास चालु केला. तसेच मुलीला पुढील उपचारासाठी कुंजीरवाडी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.