कर्नाटकात पोलिसाचा खून करून ११ वर्षे फरारी आरोपी अटकेत

By नितीश गोवंडे | Updated: March 2, 2025 14:28 IST2025-03-02T14:27:31+5:302025-03-02T14:28:13+5:30

कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरारी झाल्यानंतर त्याने दोन विवाह केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Accused absconding for 11 years after killing policeman arrested in Karnataka | कर्नाटकात पोलिसाचा खून करून ११ वर्षे फरारी आरोपी अटकेत

कर्नाटकात पोलिसाचा खून करून ११ वर्षे फरारी आरोपी अटकेत

पुणे : कर्नाटकात पोलिस कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात गेली ११ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला फुरसुंगी परिसरातून अटक करण्यात आली. विजापूरच्या शासकीय रुग्णालयातून आरोपी पसार झाला होता. तपासासाठी त्याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरारी झाल्यानंतर त्याने दोन विवाह केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अमरीश काशिनाथ कोळी (४५, रा. कलबुर्गी, कर्नाटक, सध्या रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोळी याने तीन विवाह केले आहेत. त्याच्या दोन पत्नी सोलापूरमध्ये राहायला आहेत. कर्नाटकातील गुलबर्गा परिसरात त्याची एक पत्नी राहायला आहे. कर्नाटकात पोलिस कर्मचाऱ्याचा खून केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. कारागृहातून त्याला उपचारासाठी विजापूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते. रुग्णालयातून तो पसार झाला होता. त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते. फरार झाल्यानंतर त्याने दोन विवाह केले.

फुरसुंगीतील गंगानगर भागात कोळी वास्तव्यास होता. कर्नाटकातील पोलिस कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात कोळी गेले अकरा वर्षे फरार असल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याचे छायाचित्र किंवा निश्चित माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा पोलिसांकडून माहिती मिळवली. २००९ मध्ये त्याने पोलिस कर्मचाऱ्याचा खून केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने आजारी पडल्याचा बहाणा केला. त्याला विजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ ऑगस्ट २०१४ रोजी तो रुग्णालयातून पसार झाला. याप्रकरणी विजापूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तो गेली ११ वर्षे सोलापूर आणि पुण्यात वेगळ्या नावाने वास्तव्य करत होता. कोळी फुरसुंगी परिसरात राहुल कांबळे आणि राजू काळे या बनावट नावांचा वापर करून वास्तव्य करत असल्याची माहिती फुरसुंगी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सुनील कांबळे आणि वैभव भोसले यांना मिळाली. फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून आरोपी कोळी याची माहिती आणि छायाचित्र मिळवले. त्याची माहिती कर्नाटक पोलिसांना देण्यात आली. गुलबर्गा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी भीमा नायक आणि शशीकुमार हुगार हे बुधवारी पुण्यात आले. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.

परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे, कर्मचारी महेश उबाळे, सुनील कांबळे, वैभव भोसले यांनी ही कामगिरी केली. कोळी याने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढले होते. रिक्षाचालक म्हणून काम करून, तसेच मजुरी करून तो उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Web Title: Accused absconding for 11 years after killing policeman arrested in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.