पुरंदर तालुक्यात पिंगोरी येथील वाघेश्वरी मंदिर चोरी प्रकरणातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 13:30 IST2021-07-13T13:29:05+5:302021-07-13T13:30:24+5:30

सहा वर्षांपूर्वी ५ फेब्रुवारी २०१५ ला पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील वाघेश्वरी माता मंदिरात चोरी झाली होती

Accused absconding for 6 years in Pingori temple theft case in Purandar taluka finally arrested | पुरंदर तालुक्यात पिंगोरी येथील वाघेश्वरी मंदिर चोरी प्रकरणातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

पुरंदर तालुक्यात पिंगोरी येथील वाघेश्वरी मंदिर चोरी प्रकरणातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

ठळक मुद्देआरोपीवर पुणे शहर व जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चोरी आदी एकूण १३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

जेजुरी: पुरंदर तालुक्याच्या पिंगोरी येथील वाघेश्वरी मंदिर चोरी प्रकरणातील गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेला आरोपीस पकण्यात पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याला जेरबंद करून जेजुरीपोलिसांच्या ताब्यात दिला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

याबाबतची पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी ५ फेब्रुवारी २०१५ ला पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील वाघेश्वरी माता मंदिरात चोरी झाली होती. दरवाजाचे ग्रील तोडून देवीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचांदीचे दागिने असा ९६ हजार किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची फिर्याद जेजुरी पोलीस ठाण्यात दाखल होती. तपासात अमृत पांडुरंग नानावत (वय २५, रा. दौंड) आणि पोपी लूमसिंग उर्फ दीपक कचरावत उर्फ राठोड (वय ३२, रा.  पुरंदर) यांना जेजुरी पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यातील तिसरा आरोपी प्रमोद काळूराम उर्फ जीवन नानावात (वय २९ रा. दौंड) हा गेल्या सहा वर्षांपासून फरारी होता. न्यायालयाने ही त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी केलेले होते.

पुणे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. याच मोहिमेअंतर्गत पुणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने फरारी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. आरोपी दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वेषांतर करून या पथकाने तेथे सापळा रचला होता.

आरोपी पोलिसांच्या सापळ्यात आल्यावर त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पाठलाग करत भांडगाव फाटा, यवत येथे मोठ्या शिताफीने पकडला. त्याच्यावर पुणे शहर व जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चोरी आदी एकूण १३  गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे करीत आहेत.

Web Title: Accused absconding for 6 years in Pingori temple theft case in Purandar taluka finally arrested