अनैतिक संबंधावरुन बदनामी करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:58 IST2020-12-19T14:57:26+5:302020-12-19T14:58:55+5:30
तुझे माझ्या पत्नीसोबर संबंध आहेत, हे मला माहिती आहे. हे मी तुझ्या घरी सांगतो....

अनैतिक संबंधावरुन बदनामी करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्याला अटक
पुणे : अनैतिक संबंधावरुन बदनामी करण्याची तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन एका व्यावसायिकाकडून खंडणी उकळणार्यास खंडणीविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. अविनाश वसंत जाधव (वय २८, रा. दत्तनगर, कात्रज) असे त्याचे नाव असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या व्यावसायिकाची कंपनी असून त्यामध्ये एक तरुणी सुपरवायझर म्हणून कामाला होती. तिने २०१७ मध्ये कंपनी सोडली होती. या तरुणीच्या पतीने या व्यावसायिकाला तुझे माझ्या पत्नीसोबर संबंध आहेत, हे मला माहिती आहे. हे मी तुझ्या घरी सांगतो, तुझी बदनामी करतो. पैसे नाही दिले तर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. २०१८ पासून त्याने फिर्यादीकडून आतापर्यंत २० लाख रुपये जबरदस्तीने घेतले. तो अजून ५० लाख रुपयांची मागणी करु लागला. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा या व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांच्या प्लॅननुसार या व्यावसायिकाने त्याला २ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली व पैसे देण्यासाठी नर्ह येथील नवले पुलाजवळ बोलावले. पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, सहायक फौजदार वांजळे, पोलीस नाईक अहिवळे, शिंनगारे यांनी तेथे सापळा रचला. अविनाश जाधव हा रिलॅक्स हॉटेल येथे फिर्यादीकडून २ लाख रुपये घेत असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.